बैलगाडी शर्यत रोखली; सातजणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 11:15 PM2017-09-10T23:15:07+5:302017-09-10T23:15:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव : बोरजाईवाडी (ता. कोरेगाव) येथे गावाच्या पूर्वेस असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी सुरू असलेली बैलगाडी शर्यत रविवारी पोलिसांनी रोखली. याप्रकरणी सात जणांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार वाहने जप्त केली असून, दोन बैलांनाही ताब्यात घेऊन काही वेळाने त्यांना संबंधितांच्या ताब्यात देण्यात आले.
बंदी असतानाही बोरजाईवाडीत बैलगाडी शर्यतीचे आयोजन करून प्राण्यांना निर्दयपणे व क्रूरपणे वागणूक दिली जात असल्याची माहिती काही जागरूक नागरिकांनी मंत्रालयातील बैलगाडी शर्यत प्रतिबंधक विभागाचे उच्चपदस्थ सनदी अधिकारी अनिल कटारिया व सातारा येथील पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यासोबत सोशल मीडियावर शूटिंग देखील पाठवून दिले. कटारिया व पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.
म्हेत्रे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली हवालदार महादेव खुडे, नाईक रियाज शेख, सचिन साळुंखे, गोरखनाथ साळुंखे, महादेव आळंदे, शिपाई किशोर भोसले व राहुल पवार यांनी बोरजाईवाडीत जाऊन डोंगराच्या पायथ्याला सुरू असलेली शर्यत बंद पाडली. तेथे खोंडांना घेऊन आलेले चार टेम्पो जप्त करण्यात आले. त्याचबरोबर एका मालकाने सोडलेला छकडा देखील ताब्यात घेण्यात आला आहे. पोलिसांना पाहताच बघ्यांची पळापळ झाली.
याप्रकरणी पोलिस शिपाई नीलेश येवले यांनी फिर्याद दाखल केली आहे. हवालदार शंकरराव गायकवाड तपास करीत आहेत.