बैलांच्या गाड्यांना आता ट्रॅक्टरचा लळा!
By Admin | Published: February 9, 2015 10:05 PM2015-02-09T22:05:22+5:302015-02-10T00:06:54+5:30
झटपट ऊसतोडीला पसंती : जनावरांची संख्या घटली; जुनी वाहनं खरेदी करण्याकडे कामगारांचा ओढा
राहुल तांबोळी - भुर्इंज ऊस वाहतुकीसाठी आता बैलांऐवजी ट्रॅक्टरचाच वापर मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. बैलांच्या खांद्यावर ज्या गाडीचे जू ठेवले जायचे तेच जू आता ट्रॅक्टरला जोडून बैलगाडीमालक ऊस वाहतूक करत आहेत. येथील एकट्या किसन वीर कारखान्यावर बैलगाडीचा कासरा सोडून ट्रॅक्टरचे स्टिअरिंग हाती घेणाऱ्यांची संख्या शेकडो झाली असून, त्यामुळे बैलगाड्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्याने घटली आहे. ऊसतोडणी करणारे आता वाहतुकीसाठी ट्रॅक्टर गाडीचा वापर करत असल्याने जनावरांसह माणसांनाही सुख लाभत असून, ऊसतोडणी व वाहतूक क्षेत्रात गतीने होत आहे. या नव्या बदलामुळे ऊस वाहतूक करणारी बैलगाडी दुर्मीळ होण्याची शक्यता आहे. बैलगाडीद्वारे वाहतूक करणे मोठ्या कष्टाचे असल्याने नगर, लातूर आदी भागांतून बैल घेऊन येणारे ऊसतोडणी मजूर आता ट्रॅक्टर घेऊन येत आहेत. बैलगाडीतून दोन-तीन टन ऊस वाहतूक होते. तर याच मजुरांकडून आता बैलगाडीऐवजी नव्याने वापरात आणलेल्या ट्रॅक्टरगाडीद्वारे पाच टन ऊस वाहतूक केली जात आहे. कारखाना व्यवस्थापनही पूर्वी बैलांसाठी टायरगाड्या उपलब्ध करून देत असे, त्याचप्रमाणे या ट्रॅक्टरसाठीही टायरगाड्या उपलब्ध करून देत आहेत. बैलांद्वारे केली जाणारी ऊस वाहतूक आणि ट्रॅक्टरद्वारे केली जाणारी ऊस वाहतूक यामधील फरक उसतोडणी व वाहतूक करणाऱ्या मजुरांना दिलासा देत आहे. त्यामुळे ‘मुंगळा’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरगाडींना पसंती देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. इतर ट्रॅक्टरना दोन ट्रॉली जोडलेल्या असतात. तर ऊसतोडणी मजुरांकडून बैलगाडीऐवजी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरगाडीला बैलांना जोडल्या जाणाऱ्या गाडीच्या तुलनेत काहीशी मोठी टायरगाडी वापरली जाते. बैलांना सांभळताना चारा, पेंड यासह त्यांचे आजारपण किंवा अपघात आणि ओल्या रानात बैलांची होणारी दमछाक हा सर्व त्रास सहन करावा लागतो. मात्र, ट्रॅक्टरगाडीमुळे या सर्व त्रासातून तोडणी व वाहतूक मजुरांची सुटका होत आहे. स्वत:चा त्रास कमी झाला म्हणून जेवढा आनंद या मजुरांना आहे, तेवढाच आनंद या त्रासातून बैलांची सुटका झाल्याचा आहे. नगर जिल्ह्यातील माहिजळगाव येथील बाळू कदम, राजू ननवरे, राहुल शेळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ‘बैलगाडीतून ऊस वाहतूक करताना कष्टासोबत वेळही खूप जात होता. अनेक ठिकाणी रानामध्ये तसेच रस्त्यावर चढाच्या ठिकाणी बैलांना गाडी ओढताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तसेच कारखान्यावर गाडी पोहोचल्यानंतरही ती मोकळी होईपर्यंत बैलांचा त्रास कायम असे. बैलगाडीतील ऊस उतरविल्यानंतरच बैलांना पाणी पाजणे, पेंड व चारा देणे या कामात वेळ जातो. मात्र, या मुंगळ््यामुळे या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत.’ जुन्या वाहनांना पसंती एक बैलजोडीची किंमत एक ते दीड लाख आहे. बैलांना दररोजचा लागणारा खुराक, ऊस वाहतुकीमुळे होणारा त्रास, अपघातात बैलांना होणाऱ्या दुखापतीची भीती या तुलनेत बैलगाडीऐवजी ट्रॅक्टरगाडी हा पर्याय चांगला ठरत आहे. या वाहतुकीसाठी छोटा ट्रॅक्टर किंवा जुना ट्रॅक्टर खरेदी करून बैलांऐवजी त्याचा वापर केला जात आहे. जुने ट्रॅक्टर दीड ते दोन लाखांत तर छोटे नवीन ट्रॅक्टर तीन लाखांपर्यंत उपलब्ध होत आहेत. बैलगाडीवर एक जोडपे काम करत असेल तर पहाटे चार वाजल्यापासूनच दिवस मावळला तरी कामच सुरूच असतं. त्या दोघांनी ऊस तोडायचा, बाईने मोळ्या बांधायच्या आणि एकट्या गड्याने बैलगाडीत भरायच्या. एवढं राबून हंगामात हातावर ऐंशी हजार ते एक लाख रुपये पडतात. ट्रॅक्टरगाडीमुळे गुरांचे अन् माणसांचं राबणंही थांबत आहे. - अर्चना कदम, ऊसतोडणी मजूर एकट्या किसन वीर कारखान्यावर पूर्वी सातशे ते आठशे बैलगाड्या ऊस वाहतूक करत असत. मात्र, यंदा बहुसंख्य ट्रॅक्टरने वाहतूक होते. ऊसतोडणी मजुरांनीच हा बदल आणल्याने कारखान्याच्या वतीने त्यांना पाच टन क्षमतेच्या टायरगाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. - ज्ञानेश्वर शेडगे, कृषी अधिकारी, किसन वीर कारखाना, भुर्इंज