दादागिरीने काही होत नाही, आम्हीही भीक घालत नाही; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंवर निशाणा
By नितीन काळेल | Published: July 30, 2023 06:46 PM2023-07-30T18:46:05+5:302023-07-30T18:46:29+5:30
सातारा बाजार समितीसाठी शासनाने जागा दिलेली आहे.
सातारा : सातारा बाजार समितीसाठी शासनाने जागा दिलेली आहे. त्याचा निकालही आमच्या बाजुने लागला आहे. त्यामुळे दादागिरी आणि दडपशाहीने काही होत नाही हे दिसून आले. तसेच आम्हीही असल्या गोष्टींना भीक घालत नाही,’ असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला. तसेच पालिकेत पराभव दिसत असल्यानेच साप सोडण्याचेही काम ते करतात असा टोलाही खासदार उदयनराजेंना लगावला. सातारा शहराजवळील संभाजीनगरमध्ये सातारा बाजार समितीच्या नवीन जागेत जनवारांच्या बाजाराचे उद्घघाटन करताना आमदार शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी बाजार समितीचे अध्यक्ष विक्रम पवार, उपसभापती मधुकर पवार यांच्यासह संचालक उपस्थित होते.
आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘सातारा बाजार समितीला संभाजीनगरमध्ये जागा मिळालेली आहे. या जागेचे सपाटीकरण करुन संरक्षक भिंतही बांधण्यात येणार आहे. येथील जागेसाठी जबरदस्ती दाखविण्यात आली. कायद्याच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न झाला. पण, बाजार समितीची बाजू योग्य होती हे दिसून आले आहे. शासनानेच आम्हाला जागा आरक्षित करुन दिली आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकालही आमच्या बाजुने लागलाय. कुळाचा येथे काहीच संबध येत नाही. यातून दादागिरी करुन काहीच होत नाही हेच दिसून आले आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा पालिका निवडणुकीबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल आपली भूमिका काय ? असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी स्वाऱ्थापोटी आम्ही चर्चा करणार नाही. कारण, नगरपालिकेत त्यांची पाच वर्षे सत्ता असताना विकासकामे शुन्य झाली. भ्रष्टाचार आणि टक्केवारी हाच उद्योग दिसून आला. त्यांना पराभव दिसत असल्यानेच सध्या त्यांच्याकडून साप सोडण्याचे काम सुरू आहे, असा टोला लगावला.
चालकाच्या मुलाच्या बदलीसाठी बॅंकेत...
सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक मंडळ अभ्यासदौऱ्यावर गेल्याबद्दल खासदार उदयनराजेंनी केलेल्या वक्तव्याचाही आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी समाचार घेतला. बॅंकेच्या बैठकीला ते कधीही येत नाहीत. पण, चालकाच्या मुलाच्या बदलीसंदर्भात ते येतात. चांगल्या कामाला विरोध करायचं त्यांच काम आहे. स्वत:ही काही करायचं नाही आणि दुसऱ्यालाही विरोध करायचा, अशी टीकाही त्यांनी केली.