साताऱ्यातील एमआयडीसीत गुंडगिरी, खऱ्या कामगारांना काम मिळत नाही - नरेंद्र पाटील
By दीपक देशमुख | Published: April 29, 2023 04:03 PM2023-04-29T16:03:49+5:302023-04-29T16:04:14+5:30
शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना हिंदूत्वापासून ताेडले. मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांना चॉकलेट खाऊन गप्प बसवल्याखारखे गप्प बसवले
सातारा : साताऱ्यातील एमआयडीसीत गुंडगिरी सुरू आहे. खऱ्या कामगारांना काम मिळत नाही. माथाडी कामगार, स्थानिक यांच्याऐवजी परप्रांतियांना प्राधान्य दिले जाते. ठेकेदार माथाडी कायद्याची अंमलबजावणी करत नाहीत. नावापुरता कामगार नियुक्त करतात व मलिदा खातात. एमआयडीसीत कामगारांना न्याय मिळाला पाहिजे. भुमिपुत्रांच्या हाताला काम मिळावे. याबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासमवेत विशेष बैठक आयोजित करणार असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली. दरम्यान, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनीही एमआयडीसी असोसिसशनासमवेत संयुक्त बैठक घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्यात १ लाख मराठा उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याबाबत दि. २६ रोजी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, आघाडी सरकारने बंद केलेली ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज योजना सुरू करण्याचा निर्णयही महामंडळाने घेतला आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत १० लाखांची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवून कालावधी परतफेड ७ वर्षे केला आला. यासह अनेक योजनांची माहिती त्यांनी दिली.
मराठा समाजातील छोटे मोठे व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या तरुणांना बळ देण्यासाठी लघु कर्ज योजनेची सुरुवात करण्यात येणार असून त्या अंतर्गत २ लाखापर्यंत कर्ज देण्यात येईल. कर्जावरील व्याज परतावा महामंडळ देईल. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना सुरु करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
सीबील स्कोअर होण्यासाठी मराठा समाजातील प्रत्येक मुलाने बँकेत खाते काढावे. त्यात थोडेफार बचत करावी. हिंदी भाषकांकडून पुरेसे सहकार्य मिळत नाहीत. योजनेबाबत नकारात्मकता दाखवतात. त्यामुळे आम्ही महामंडळाची योजना इंग्रजी आणि हिंदीमध्येही भाषांतरीत करत आहाेत. जेणेकरून लाभार्थ्यांशी संवाद साधता येईल. स्टेट बँकेच्या शाखा जास्त असतानाही बँक ऑफ इंडियाने मोठ्या प्रमाणावर कर्ज वितरण त्यांनी यावेळी सांगितले.
.. तर अजित पवारांचे स्वागत
सोळा आमदार अपात्र ठरले तर अजित पवार भाजपात येतील काय असा प्रश्न विचारला असते पाटील म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सोळा आमदारांच्या बाजूनेच लागेल. अजित पवार येत असतील तर वेलकम! पक्षश्रेष्ठी त्यांचे स्वागत करतील. हा पक्षाचा धोरणात्मक विषय आहे. तथापि, हे सरकार अजिबात काेसळणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात चांगला समन्वय आहे. २०१९ मध्ये सरकार स्थापनेची वेळ आली त्यावेळी खा. पवार यांनी उद्धव ठाकरेंना हिंदूत्वापासून ताेडले. त्यांचे वडील हिंदूत्वाबाबत परखडपणे बोलत पण उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांना चॉकलेट खाऊन गप्प बसवल्याखारखे गप्प बसवले.
एजंटगिरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार
युवकांनी व्यवसाय करण्याचे प्रशिक्षण करून रितसर कर्ज मागितल्यास बँक कर्ज देण्यास कुठलीही अडकाठी करणार नाही. अपुरी माहिती, अनुभव नाही, सीबील स्कोअर नसल्यास बँका टाळाटाळ करतात. याचा अभ्यास करून युवकांनी बँक खाते व्यवस्थित हाताळावे. कर्ज मिळवून देताना जर एजंटगिरी होत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असेही ते म्हणाले.
दोन्ही राजेेंसमवेत मिसळ खायची आहे
एकदा आ. शिवेंद्रराजेंसमवेत मिसळ पाव खाल्ला होता. त्यांनंतर खा. उदयनराजेसमवंत मिसळ खायची आहे. त्यामुळे एकदा दोन्ही राजेंना सोबत घेवून मिसळपाव खाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नवी मुंबई बाजार समितीवर प्रशासक नेमावा
नवी मुंबई बाजार समितीवर प्रशासक नेमण्याची अनेकदा मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या बाजार समितीत मोठा गैरव्यहार असल्याचा आरोप त्यांनी केला.