शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:29 AM2018-01-15T00:29:56+5:302018-01-15T00:29:56+5:30
वडूज : चौदा वर्षीय शाळकरी मुलीवर सलग दोन दिवस जबरदस्तीने चार अल्पवयीन युवकांनी अत्याचार केल्याची खळबळजनक घटना खटाव तालुक्यातील एका गावात घडली. संबंधित युवकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणत असताना संतप्त जमावाने रविवारी तिघा आरोपींना मारहाण केली. त्यामुळे पोलीस ठाण्यासमोर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलीच्या आईचा पुतण्या हा शनिवारी (दि. १३) घरी आला व त्याने सांगितले की, ‘गावातील काही मुले दीदीच्या पाठीमागे असतात व ते घराकडे येत असतात. तुम्ही दीदीकडे विचारपूस करा.’ त्यानंतर आई-वडिलांनी विचारपूस केली असता पीडित मुलीने रडत आपल्यावर बेतलेला प्रसंग सांगितला. पंधरा दिवसांपूर्वी गावातील चार युवक माझ्या पाठीमागे लागून त्रास देत होते. रविवार, दि. ३१ डिसेंबर २०१७ रोजी पीडित मुलगी एकटी घरी असताना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संबंधित चौघे घरात आले. त्यावेळी आई शेतात तर वडील सातारा येथे कामानिमित्त गेले होते. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे,’ असे म्हणून त्या युवकाने घरात जबरदस्तीने अतिप्रसंग केला. त्यानंतर त्याचा एक मित्र आला. त्यानेही चाकूचा धाक दाखवून अतिप्रसंग केला. थोड्यावेळाने तेथून तो निघून गेला. त्यानंतर दुसºया दिवशी दि. १ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता घरात कोणी नसताना चौघे युवक पुन्हा घरी आले. त्यातील एकाने पुन्हा अतिप्रसंग केला आणि घरातून बाहेर गेला. लगेच त्याचा एक मित्र घरात येऊन जबरदस्तीने पुन्हा त्याने अतिप्रसंग केला. त्यानंतर पीडित मुलगी रडत असताना त्याचा आणखी एक मित्र घरात आला व त्यानेही जबरदस्तीने अतिप्रसंग केला. पुन्हा सर्वजण घरात येऊन झालेल्या प्रकाराबाबत ‘कोणाला सांगितलं तर तुझ्या आई-वडिलांना जिवंत ठेवणार नाही,’ अशी धमकी देऊन निघून गेले. दरम्यान, तीनही संशयितांना पोलिसांनी रविवारी सायंकाळी सात वाजता ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. यावेळी संतप्त जमावाने त्यांना पोलिसांसमक्ष मारहाण केली. पोलिसांनी प्रसंगावधान राखून जमावाच्या तावडीतून त्यांची सुटका केली. रात्री उशिरा पोलिसांनी आणखी एकास ताब्यात घेतले.
जलद कृती दल तैनात
सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे खटाव तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून, संतप्त जमाव आक्रमक झाला आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक संदीप पाटील हे स्वत: घटनास्थळी दाखल झाले. तसेच जलद कृती दलालाही तैनात केले आहे. गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.