‘बंडोबां’मुळे संघ-समितीची वाढणार डोकेदुखी
By admin | Published: June 14, 2015 11:52 PM2015-06-14T23:52:06+5:302015-06-14T23:56:08+5:30
शिक्षक बॅँक निवडणूक : नऊ गटांत दुरंगी तर बारा गटांत तिरंगी लढत
कुडाळ : प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेच्या निवडणुकीत सत्तेच्या चाव्या असलेल्या माजी आमदार शिवाजीराव पाटील प्रणित संघ व थोरात प्रणित संघात मनोमिलन झाल्यामुळे सत्ताधारी समितीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. बॅँकेच्या या निवडणुकीत नऊ मतदारसंघांत दुरंगी लढत होणार तर बारा मतदारसंघांत इच्छुकांनी बंडखोरी केल्यामुळे या बंडोबांमुळे संघ समितीची डोकेदुखी वाढलेली पाहायला मिळत आहे. या बारा गटांत तिरंगी लढतीची शक्यता आहे. त्यामुळे बंडखोरांची समजूत काढण्यात दोन्ही गटांचे नेते कामाला लागले आहेत.
बॅँकेची सत्ता मिळविण्यासाठी दोन्ही संघटनांमध्ये काऊंटडाऊन सुरू झाले आहे. जिल्ह्यात जावळी, महाबळेश्वर, खंडाळा, दहिवडी, गिरवी, म्हसवड, फलटण या मतदारसंघांत संघाची ताकद आहे.
संघाचा बालेकिल्ला असलेल्या जावळीत संघाला धोका नाही; मात्र खंडाळा तालुक्यात संघाचे माजी बँक संचालक मच्छिंद्र ढमाळ यांनी संघाचे अधिकृत उमेदवार भगवान धायगुडे यांच्याविरोधात दंड थोपटले आहे. त्यामुळे खंडाळ्यातील बंडाळीची चर्चा जिल्ह्यात जास्त आहे. तर गिरवी-तरडगाव गटात शिवाजीराव पाटील प्रणित संघाचे राज्य कार्याध्यक्ष तुकाराम कदम यांनी समितीसह बंडखोरांसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. त्यांच्यासाठी शिक्षकसंघाची टीम कामाला लागलेली पाहायला मिळत आहे. तशीच परिस्थिती दहिवडी मतदारसंघात आहे. महेंद्र अवघडे व समितीचे विजय चव्हाण व बंडखोर, असा सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.समितीची वाई, कोरेगाव, रहिमतपूर, मायणी, परळी मतदारसंघांवर मजबूत पकड आहे. मात्र, समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर देवरे यांच्या परळी मतदारसंघातच महेश वंजारी यांची बंडखोरी समितीचे उमेदवार अनिल चव्हाण यांना डोकेदुखी ठरणार आहे. तर आरळे मतदारसंघात समितीने दोंदे गटाला उमेदवारी दिल्यामुळे या मतदारसंघात दोंदे गटाला विजयासाठी जोरदार प्रयत्न करावे लागणार
आहे. याठिकाणी संघाने नगरपालिकेच्या ज्ञानेश्वर कांबळे यांना अनुसूचित जाती-जमाती राखीव गटातून उमेदवारी दिल्यामुळे नगरपालिकेतील मते या मतदारसंघात निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे दोंदे गटाच्या रजनी चव्हाण, विरोधी गटाचे दत्तात्रय कोरडे यांच्यातच सामना रंगणार व कांबळे यांची भूमिका निर्णायक ठरणार हे निश्चित. (प्रतिनिधी)
बंडखोरांची संघातून हकालपट्टी करा
शिक्षक संघाने शिखर-शिंगणापूर येथून तर शिक्षक समितीने अंगापूर येथून धुमधडाक्यात प्रचाराचा शुभारंभ केला. समितीने बँकेवर तर संघाने बॅँकेसह शिक्षकांचे प्रश्न हा प्रचाराचा मुद्दा केला. प्रचाराच्या या सभेत माजी आमदार शिवाजीराव पाटील यांनी बंडखोरांच्या बाबतीत कडक भूमिका घेऊन अशा बंडखोरांची संघातून हकालपट्टी करावी, असे आदेश जिल्ह्यातील नेत्यांना दिले.