पुसेगावमधील बंधारा पूर्ण क्षमतेने भरला
By admin | Published: November 23, 2014 08:39 PM2014-11-23T20:39:24+5:302014-11-23T23:43:17+5:30
अवकाळीची कृपा : विहिरींना पाणी वाढल्याचे शेतकरी आनंदीत
पुसेगाव : जिहे-कठापूर योजनेअंतर्गत काटकरवाडी (जयपूर) ता. खटाव येथील येरळा नदीवर बांधलेला केटी वेअर बंधारा नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने पूर्ण क्षमतेने भरला आहे. सुमारे एक दशलक्ष घनफूट एवढा पाणी साठा झाला असून, परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे.
२०१२ मध्ये बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्याची लांबी ६४ मीटर तर उंची जमिनीखाली ८.५ मीटर व जमिनीवर चार मीटर इतकी आहे. एक दशलक्ष घनफूट इतकी पाणी साठवण क्षमता या बंधाऱ्याची असून, या पाण्यामुळे येरळा नदीकाठचे सुमारे २७० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत आहे. तसेच पुसेगाव व काटकरवाडी या गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरी या बंधाऱ्याजवळ असल्याने आगामी काळात पाणीटंचाईची समस्या भेडसावणार नाही.
या बंधाऱ्याची टॉप लेवल २.५ मीटर असल्याने व ग्रामस्थांच्या मागणीनुसार बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूस पाईप रेलिंग बसवल्याने पुराच्यावेळी शेतकऱ्यांना नदीच्या पलीकडील शिवारात ये-जा करणे तसेच ट्रॅक्टर, बैलगाडीची ने-आण करणे सहज सोपे झाले आहे.
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने हा बंधारा पूर्णक्षमतेने भरला असून, विहिरींना पाणी वाढले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या पाण्याची अडचण दूर होण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (वार्ताहर)
काटकरवाडी येथे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात यंदा पहिल्यांदाच हिवाळ्यात पाणीसाठा झाला आहे. हिवाळ्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. याबरोबरच विहरींच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झाली आहे. शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना दिलासा मिळाला आहे.