जंगले तोडून धनिकांनी बांधले बंगले!
By admin | Published: November 17, 2014 10:45 PM2014-11-17T22:45:19+5:302014-11-17T23:21:38+5:30
महाबळेश्वरचा निसर्ग धोक्यात : महसूल विभाग पंचनामे करण्यापुरताच
महाबळेश्वर : महाबळेश्वरपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या मेटतळे गावच्या हद्दीत अनेक धनिकांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून विनापरवाना बंगले बांधले आहेत. महसूल विभागाने पंचनामे केले; परंतु कोणत्याही बांधकामावर अथवा वृक्षतोडीवर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या भागातील निसर्गसंपदा नष्ट होत चालली आहे. या कामासाठी स्थानिकच आर्थिक फायद्यासाठी धनिकांना मदत करीत असल्याने येथील पर्यावरण धोक्यात आले आहे.
अशाच पद्धतीने तीस गुंठे क्षेत्र असलेल्या येथील मिळकत नं. ५ चा २ मध्ये मुंबईच्या धनिकाने स्थानिक दलालांच्या मदतीने एक आलिशान बंगला बांधला आहे. पूर्वीप्रमाणे याही बंगल्याच्या बांधकामाला प्रारंभ होताच, तलाठ्यांनी पंचनामा केला व पुढील कारवाईसाठी पाठविला. त्यानंतर अल्पावधीतच या मिळकतीमध्ये बंगल्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. आता हा बंगला हॉटेल व्यवसायासाठी सज्ज झाला आहे; परंतु विनापरवाना बांधकाम अथवा विनापरवाना वृक्षतोड यासंदर्भात या मिळकतधारकावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या संदर्भात तलाठ्यांना विचारताच ‘पंचनामा करणे आमच्या हातात आहे, कारवाई आम्ही करू शकत नाही, ती अधिकारी यांनी केली पाहिजे,’ असे उत्तर दिले जाते. तर दलालांना विचारले असता, ‘सर्व काही मॅनेज करता येते, त्यामुळे येथील बांधकामावर कोणतीही कारवाई होणार नाही,’ असा आत्मविश्वास ते व्यक्त करतात.
यासाठी यंत्रणा कशी मॅनेज करायची याचे धडेही या भागातील दलाल धनिकास देतात व या संदर्भातील सर्व मदत ते करतात. वृक्षांची कत्तल करून त्याचे पुरावे नष्ट करण्याचे हातखंडे या दलालांकडे आहेत. कधी मुळासह वृक्ष उपटले जातात, तर कधी बुंध्यापासून तोडले जातात. कधी जाळून तर कधी गाडून पुरावे नष्ट केले जातात. काहीदा गावातील लोकांना ते मोफत वाटण्यात येते. त्यानंतर तेथे बांधकाम होते. त्यानंतर तलाठी बांधकामाचा पंचनामा करून वरिष्ठ विभागाकडे पाठवितात. तलाठ्यांनी या मिळकतीकडे परत कधी फिरकू नये, यासाठी स्थानिक दलाल सर्व व्यवस्था करतात. प्रशासनाने कडक भूमिका घेण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
पर्यावरणाचे रक्षण व संवर्धनासाठी केंद्र शासनाने संपूर्ण तालुका हा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील म्हणून घोषित केला आहे. तरीही या भागात मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होताना दिसत आहे. महाबळेश्वर-पाचगणी रस्ता, तापोळा रस्ता, महाबळेश्वर, माचुतर या भागातील जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे मुंबई-पुण्याच्या धनिकांना येथील दलाल हे प्रतापगड रस्त्यावर असलेले मेटतळे गाव दाखवितात. या गावातून किल्ले प्रतापगड व किल्ले मकरंदगडाचे विलोभनीय निसर्गसौंदर्य नजरेस पडत असल्यामुळे अवैध बांधकामे होत आहेत.