लोणंद येथील किराणा मालाचे दुकान फोडून ५९ हजारांच्या साहित्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:25 AM2021-06-30T04:25:02+5:302021-06-30T04:25:02+5:30
लोणंद : लोणंद येथील किराणा मालाचे दुकान फोडून ५८ हजार नऊशे रुपयांच्या किराणा मालाची चोरी रविवारी रात्री करण्यात ...
लोणंद : लोणंद येथील किराणा मालाचे दुकान फोडून ५८ हजार नऊशे रुपयांच्या किराणा मालाची चोरी रविवारी रात्री करण्यात आली. तसेच दुसरे दुकान फोडून पाच ट्रे अंड्याची चोरीही करण्यात आली. त्यामुळे व्यापाऱ्यांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोणंद-नीरा लोणंद रोडवर राधेश्याम वजन काट्यासमोर सिद्धिविनायक हॉस्पिटलशेजारी असणाऱ्या मलगुंडे किराणा दुकानाचे शटरचे कुलूप फोडून ५८ हजार नऊशे रुपयांचा किराणामाल चोरट्यांनी रातोरात लंपास केला, अशी तक्रार दुकान मालक दादासाहेब भानुदास मलगुंडे यांनी लोणंद पोलिसात दिली आहे.
दादासाहेब मलगुंडे हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी सव्वाआठच्या दरम्यान दुकान उघडण्यास आले असता त्यांना त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडल्याचे व दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. आतमध्ये जाऊन पाहिले असता दुकानाच्या आतील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. त्यांनी तत्काळ लोणंद पोलिसांना याची माहिती दिली.
यामध्ये त्यांचे दहा हजार रुपये किमतीचे तेलाचे पंधरा लीटरचे पाच डबे, तेलाचे सोळा खोके त्याची अंदाजे किंमत वीस हजार रुपये, ३ हजार ४०० रुपयांची शंभर किलो साखर, तीन हजार रुपयांची वीस किलो तूरडाळ, तीन हजार रुपये किमतीची मूगडाळ वीस किलो, पन्नास किलो तांदूळ त्याची किंमत आठ हजार रुपये, तसेच काजू दोन किलो, बदाम तीन किलो, दोन किलो वेलची, सोसायटी चहा पावडर, साबण बॉक्स, संतूर, हार्पिक, बिस्कीटचे पाच बॉक्स, रोख दीड हजार रुपये असा ५८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला, अशी तक्रार देण्यात आली आहे. लवकरात लवकर या चोरट्यांचा तपास करावा, अशी मागणी मलगुंडे यांनी केली आहे.
तसेच केतकी गार्डनसमोर असणारे आमिर चिकन शॉपचे कुलूप तोडून पाच ट्रे अंड्यांची चोरी अज्ञात चोरांनी केल्याची माहिती आमिर काझी यांनी दिली.