सात महिन्यानंतर घरफोडी उघडकीस, तिघे ताब्यात; चोरीचा मुद्देमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 04:40 PM2020-08-20T16:40:45+5:302020-08-20T16:41:58+5:30
मत्त्यापूर ता. सातारा येथून दोन लाख रूपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एकाला बोरगाव पोलिसांनी अटक केली तर दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नागठाणे : मत्त्यापूर ता. सातारा येथून दोन लाख रूपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एकाला बोरगाव पोलिसांनी अटक केली तर दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी, मत्त्यापूर येथील वंदना शंकर घोरपडे यांच्या घरातून चोरट्यांनी सुमारे दोन लाख रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. ही घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती. त्यानंतर बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर व त्यांच्या पथकाने या चोरीचा कसून तपास केला.
संबंधित चोरटे हे बोरगाव पोलीस ठाण्याच्या परिसरात येणार असल्याची माहिती बुधवारी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा लावून संशयिताना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मयूर विलास ननावरे (वय २४, रा.विसावानाका, मूळ करंजे सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर अन्य दोघे अल्पवयीन आहेत. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, मनोहर सुर्वे, स्वप्नील माने, किरण निकम, विजय सांळुखे, विशाल जाधव, प्रकाश वाघ यांनी ही कारवाई केली.