साताऱ्यात आरोपीच्या घराच्या दरवाजावर फेकले पेटते पोते, युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणाचे पडसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 01:19 PM2024-08-29T13:19:28+5:302024-08-29T13:20:19+5:30
तिघांवर गुन्हा : आग आटोक्यात आणणाऱ्या महिला पोलिसाला धक्काबुक्की
सातारा : एका युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणाचे पडसाद अजूनही साताऱ्यात धुमसत असून, तिघा संशयितांनी या प्रकरणातील आरोपीचे घर पेटविण्याचा मंगळवारी प्रयत्न केला. पोत्यावर डिझेल ओतून पेटते पोते संशयित आरोपीच्या घराच्या दरवाजावर फेकले. यावेळी आग आटोक्यात आणताना महिला पोलिसाला धक्काबुक्कीही करण्यात आली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
अमोल बापू माने (वय ४०, रा. लक्ष्मी टेकडी, सदर बझार, सातारा), हणमंत जाधव (वय ३७, रा. सैदापूर, ता. सातारा), दुर्योधन किसन भोसले (वय ३५, रा. लिंब, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. माण तालुक्यातील एका गावात चार दिवसांपूर्वी अल्पवयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पीडित युवती साताऱ्यात वास्तव्य करत होती. या घटनेनंतर संतप्त जमावाने साताऱ्यात रास्ता रोको सुद्धा केला होता. दहिवडी पोलिसांनी संशयित आरोपीला अटकही केली. परंतु दोन दिवसानंतर हे प्रकरण शांत होत असतानाच मंगळवारी दुपारी पुन्हा या प्रकरणाने डोकेवर काढले.
या तिघा संशयितांनी मंगळवारी दुपारी साडेचार वाजता संशयित आरोपीचे घर पेटविण्यासाठी पोत्यावर डिझेल ओतून पोते पेटवले. त्यानंतर पेटते पोते संशयित आरोपीच्या घराच्या दरवाजावर टाकले. हा प्रकार निदर्शनास येताच महिला पोलिस कर्मचारी जयश्री सुतार यांनी आग आटोक्यात आणण्याचा तातडीने प्रयत्न केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. परंतु त्यांना तिघा संशयितांनी धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणला.