महामार्गावर बर्निंग कारचा थरार!
By admin | Published: August 29, 2016 12:02 AM2016-08-29T00:02:46+5:302016-08-29T00:02:46+5:30
महालक्ष्मीचे दर्शन घेऊन परतत असलेल्या कारने अचानक पेट घेतला
मलकापूर : कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे दर्शन घेऊन परतत असलेल्या कारने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून कार महामार्गाकडेला थांबवली. गाडीतील महिलांसह सहाजण बाहेर पडताच आगीने रौद्ररूप धारण केले. काही कळण्याअगोदरच कार जळून खाक झाली. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हायवेवरील बर्निंग कारच्या थरारामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, डहाणू येथील दिनेश परशुराम बारी हे कारमधून (एमएच ०४ सीजी ८०४०) कुटुंबासह कोल्हापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. महालक्ष्मीचे देवदर्शन आटोपून ते परत डहाणूकडे जात होते. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गोटे, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत आले असता गाडीच्या बॉनेटमधून धूर निघत असल्याचे चालक राजू लक्ष्मण वर्सा यांच्या निदर्शनास आले.
गाडी काही अंतरावर तशीच नेली असता जास्तच धूर येत असल्याने चालकाने गाडी हायवेकडेला थांबवली. गाडीतील बारी कुटुंबातील तीन महिला व दोन पुरुषांसह चालक गाडीतून खाली उतरले. त्यावेळी गाडीने पेट घेतला. काही कळण्यापूर्वीच आगीने रौद्ररूप धारण केले.
प्रसंगावधान राखून महामार्गावरून निघालेल्या सहायक पोलिस निरीक्षक विद्या जाधव यांनी आपली गाडी घटनास्थळी थांबवली. त्यांनी तत्काळ अग्निशामक दलासह देखभाल विभागाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर देखभाल विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच तळबीड पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक विद्या जाधवसह महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, सुधाकर लोंढे, योगेश पवार, सचिन जाधव, अजय भोसले, मिथून शिंदे, राजू जाधव यांनी महामार्गावरील वाहतूक थांबवून अग्निशामक दलाच्या मदतीने एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझविली. (प्रतिनिधी)