जळी, स्थळी वर्षानुवर्षे हातबॉम्ब राहतात जिवंत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:37 AM2021-05-24T04:37:11+5:302021-05-24T04:37:11+5:30

कऱ्हाड : कोयना नदीपात्रात आढळलेले बॉम्ब साठ वर्षांपूर्वी बनविलेले असल्याचे समजताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. एवढ्या वर्षांपूर्वीचे बॉम्ब पाण्यात राहुनही ...

Burnt, grenades remain alive for years! | जळी, स्थळी वर्षानुवर्षे हातबॉम्ब राहतात जिवंत !

जळी, स्थळी वर्षानुवर्षे हातबॉम्ब राहतात जिवंत !

Next

कऱ्हाड : कोयना नदीपात्रात आढळलेले बॉम्ब साठ वर्षांपूर्वी बनविलेले असल्याचे समजताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. एवढ्या वर्षांपूर्वीचे बॉम्ब पाण्यात राहुनही जिवंत कसे, असा प्रश्नच अनेकांना पडला. मात्र, हातबॉम्ब वर्षानुवर्षे कोणत्याही परिस्थितीत ‘अ‍ॅक्टिव्ह’ राहू शकतात, असा खुलासा पोलिसांनी केला आहे. आता तांबवेत आढळलेल्या ‘त्या’ बॉम्बचा साठ वर्षांतील प्रवास शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

प्लास्टिक वगळता पृथ्वीवर कायमस्वरूपी काही टिकत नाही, असं म्हणतात. कोणतीही वस्तू विशिष्ट कालावधीनंतर पूर्णपणे नष्ट होते. किमान वस्तूच्या निष्क्रियतेला तरी हमखास सुरुवात होत असते. मात्र, बॉम्ब सहजासहजी आणि हलक्यात नष्ट होत नसतात, असे बॉम्बशोधक आणि नाशक पथकात काम केलेले निवृत्त पोलीस उपअधीक्षक संभाजी पाटील यांच म्हणणे आहे. बॉम्बसाठी वापरण्यात येणारा धातू विशिष्ट प्रकारचा असतो. त्याला वर्षानुवर्षे पाण्यात ठेवले तरी लवकर गंज चढत नाही. तसेच उच्च तापमानाशिवाय तो वितळतही नाही; पण गंज चढून अथवा वितळल्यानंतरही त्यातील दारूगोळा पेट घेतोच. त्यामुळे हलकासा का होईना, त्याचा स्फोट होतोच होतो, असे संभाजी पाटील यांनी सांगितले.

तांबवेत नदीपात्रामध्ये आढळलेले बॉम्ब किती दिवस पाण्यात राहिले, हे सांगता येत नाही. मात्र, ते खड्ड्यात पुरून स्फोट करूनच नष्ट करावे लागले. कोणताही हातबॉम्ब अशाच पद्धतीने नष्ट करावा लागतो, असेही निवृत्त पोलीस उपअधीक्षक संभाजी पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

- कोट

सैन्यदलात वापरल्या जाणाऱ्या हँडग्रेनेडमध्ये ‘हाय एक्स्प्लोझिव्ह’ असते. ‘फायरिंग पिन’ काढल्याशिवाय त्याचा स्फोट होत नाही. ते नष्ट करण्यासाठीही स्फोट हा एकच पर्याय असतो. कित्येक वर्ष हे बॉम्ब ‘अ‍ॅक्टिव्ह’ राहू शकतात. वातावरणाचा त्यांवर कसलाही परिणाम होत नाही.

- संभाजी पाटील

निवृत्त पोलीस उपअधीक्षक

- चौकट

कसे होते ‘ते’ बॉम्ब..?

तांबवेत तीन हातबॉम्ब आढळले होते. या तिन्ही बॉम्बचा आकार अंडाकृती होता. लाल, हिरवा रंग आणि आयताकृती खाचा होत्या. तिन्ही बॉम्ब लोखंडी होते. तसेच त्यावर एक क्रमांकही लिहिलेला होता. हा क्रमांक पोलिसांच्या तपासाला दिशा देणारा ठरला आहे.

- चौकट

हादरवून टाकणारा स्फोट

बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने तांबवेत आढळलेले तिन्ही बॉम्ब खड्ड्यात पुरून फोडले. त्यावेळी त्यांचा मोठा स्फोट होऊन हादरवून टाकणारा आवाज झाला होता. साठ वर्षांनंतरही ते बॉम्ब पूर्णपणे ‘अ‍ॅक्टिव्ह’ होते, हे त्यावरून दिसून येते.

- चौकट

कोठून आले ते शोधलं, आता कोणी आणले, याचा तपास !

तांबवेत आढळलेले बॉम्ब भारतीय संरक्षण विभागाच्या खडकी-पुणे येथील आयुध निर्माण फॅक्टरीमध्ये १९६१ साली बनविले गेले आहेत. त्यांचा सैन्यदलाला पुरवठा झाला असल्याची माहितीही पोलीस तपासातून समोर आली आहे. आता सैन्यदलातील ते बॉम्ब तांबवेच्या कोयना नदीपात्रापर्यंत कोणी आणले, याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.

फोटो : २३केआरडी०१

कॅप्शन : तांबवेत आढळलेले बॉम्ब.

Web Title: Burnt, grenades remain alive for years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.