भुर्इंजच्या सभेत दारूबंदीचा भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:35 PM2017-08-16T23:35:56+5:302017-08-16T23:35:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचवड : अनेक दिवसांपासून संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरलेल्या भुर्इंजच्या दारूबंदीचा स्वातंत्र्यदिनादिवशीच असलेल्या ग्रामसभेत भडका उडविला. सुमारे पाच हजार सह्यांच्या निवेदनासह उपस्थित असलेल्या शेकडो नागरिकांनी केलेल्या दारूबंदीच्या मागणीला ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी ठेंगा दाखवून सभेतून काढता पाय घेतल्याने ग्रामसभेमध्ये वादावादी होऊन मोठा तणाव निर्माण झाला.
ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक व विस्तार अधिकारी यांनी दारूबंदीच्या मागणीवरून दाखविलेल्या पळपुटेपणामुळे भुर्इंजच्या ग्रामस्थांचा अपमान झाला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुधीर भोसले-पाटील यांनी केली आहे. तर सभेचे संपूर्ण कामकाज संपल्यामुळेच पदाधिकारी सभेतून निघून गेले असल्याचे सरपंच बाळासाहेब कांबळे यांनी सांगितले.
स्वातंत्र्यदिनादिवशी भुर्इंज येथील शिवाजी मैदानात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. अनेक दिवसांपासून भुर्इंजमध्ये दारूबंदीवरून आरोप-प्रत्यारोप होत होते. त्यामुळे स्वातंत्र्यदिनादिवशी होणाºया ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव करण्याची मागणी होणार होती. त्यामुळे भुर्इंजच्या आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच ग्रामस्थांची ग्रामसभेस एवढी प्रचंड उपस्थिती होती. सरपंच बाळासाहेब कांबळे यांनी सभेच्या सुरुवातीस केलेल्या कामांची माहिती दिली तसेच विषयपत्रिकेवरील सर्व विषय ग्रामस्थांपुढे मांडून त्यास मंजुरी घेतली. त्यानंतर ऐनवेळच्या विषयांवर चर्चा सुरू झाल्यानंतर सुधीर भोसले-पाटील यांनी दारूबंदीच्या ठरावाची मागणी केली. त्यांना मध्येच थांबवत सरपंच बाळासाहेब कांबळे यांनी आणखी काही विषय राहिले आहेत, असे सांगत पुन्हा बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर भाऊसाहेब जाधवराव यांनी गावात महालक्ष्मी मंदिर व परिसराचे विकासकाम सुरू असताना तेथे एवढ्या गर्दीने तुम्ही का येत नाही? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर राजेंद्र भोसले यांनी त्याची कारणे शोधा असे सांगताच वादावादीला सुरुवात झाली.
यावेळी जितेंद्र वारागडे आणि पोपट शेवते यांच्यातही जोरदार बाचाबाची झाली. पोपट शेवते यांनी वाळू उपशात मोठा घोळ झाल्याचा आरोप केला. त्यानंतर विलासभाऊ जाधवराव यांनी सर्व वातावरण शांत करीत गावात होत असलेली कामे ग्रामस्थांच्याच सहकार्यातून होत असल्याचे सांगितले. महालक्ष्मी मंदिर परिसराचे कोटभर रुपयांचे काम उत्कृष्ट झाले आहे, हे सर्वांनी मान्यच केले पाहिजे. असे सांगून त्या कामात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहनही केले. दारूबंदी संपूर्ण तालुक्यातच झाली पाहिजे, त्याची सुरुवात भुर्इंजपासून करू या, असे सांगितले. त्याला सर्वांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
मात्र, त्यांनतर पुन्हा दारूबंदीचा विषय चर्चेला आल्यानंतर सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य व दारूबंदीच्या विरोधकांनी सभा संपल्याचे जाहीर करून, तेथून काढता पाय घेतला. या सर्व प्रकारामुळे दारूबंदी झाली पाहिजे, असा आग्रह धरणाºयांनी संताप व्यक्त करीत जागेवरच ठिय्या मांडला. त्यावेळी बोलताना सुधीर भोसले-पाटील यांनी सभा संपली नसतानाच सत्ताधाºयांनी पळ काढला असून, हा जनतेचा अपमान असल्याचे सांगितले. चौदाव्या वित्त आयोगातील निधी खर्चाची माहिती मागून दिली नाही, सौर दिवे बसवण्याच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. साडेपाच हजार सह्यांद्वारे दारूबंदीची मागणी केली जात असताना तसा ठराव केला जात नाही, जनतेचा आवाज दाबला जात आहे, असा आरोप केला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व वाई पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे या प्रकाराची तक्रार करून ग्रामसेवक व विस्तार अधिकारी या दोघांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
याला सर्वांनी कानफाडला पाहिजे
ग्रामसभा सुरू असताना एकाने गावात दारूबंदी करण्यास आपला विरोध आहे, असे सांगून दारूबंदी केल्यास बेकायदा दारू विकली जाईल, असे सांगितले. त्यावर दारूबंदी विरोधकांनी जोरदार टाळ्यांचा गजर केला. मात्र प्रथमच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांपैकी एका महिलेने, ‘याला सर्वांनी कानफाडला पाहिजे,’ अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
दारूमुक्तीत भुर्इंज आधी की तालुका ?
भुर्इंजमध्ये दारूबंदीची होत असलेली मागणी राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करून, आधी वाई शहर, जांब येथील दारूबंदी करण्याची मागणी समर्थकांनी केली. जांब व वाईमधील दारू दुकाने का बंद करत नाही? असा त्यांचा सवाल आहे. तर त्यावर उत्तर देताना आपल्या गावाचे आपण पाहू या, त्या-त्या गावाचे पाहण्यास ते-ते लोक समर्थ आहेत. आपल्या गावात दारूबंदी करून त्यांच्यापुढे आपण आदर्श ठेवू या. आपले पाहून तेथेही आपोआप याबाबत प्रक्रिया सुरू होईल. मात्र विशिष्ठ हेतूने दारूचे समर्थन का करता? असा प्रतिप्रश्न दारूबंदी समर्थकांकडून होत आहे.
दारूमुुळे निवडणुकीत डिपॉझिटही राहात नाही.
शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अतुल जाधवराव म्हणाले, ‘दारूमुळे सर्वांचेच नुकसान होत आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर दारूचा वापर होतो आणि त्यामुुळेच आमच्या पक्षातील उमेदवारांचे डिपॉझिटही राहात नाही. त्याचा जबाब आम्हाला वरती द्यावा लागतो.
मात्र, असे असले तरी याच दारूदुकानदारांचा पैसा मंडळांना, देवांच्या कामाला कसा चालतो? त्यामुळे आधी संपूर्ण तालुक्यात दारूबंदी करा, मगच भुर्इंजमध्ये दारूबंदी करा,’ अशी मागणी केली.