आंबेनळी घाटात सहलीच्या बसला अपघात, विद्यार्थ्यांना सुरक्षित काढले बाहेर
By सचिन काकडे | Updated: February 22, 2025 14:16 IST2025-02-22T14:14:41+5:302025-02-22T14:16:05+5:30
विद्यार्थ्यांना आपत्कालीन दरवाजातून तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टाळला.

आंबेनळी घाटात सहलीच्या बसला अपघात, विद्यार्थ्यांना सुरक्षित काढले बाहेर
सातारा : पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाटात शनिवारी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास सहल घेऊन आलेल्या एसटी बसला अपघात झाला. विद्यार्थ्यांना आपत्कालीन दरवाजातून तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टाळला.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील विद्यार्थ्यांची सहल घेऊन आलेली एसटी बस (एमएच ४० एक्यू ६२२५) प्रतापगडाहून महाबळेश्वरकडे निघाली होती. बसमधून ६० विद्यार्थी प्रवास करत होते. वाडा कुंभारोशी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर येताच एका तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले व बस रस्त्याकडेला कलली. एसटीची चाके मातीच्या ढिगार्यात रुतून बसल्याने बस पलटी होता होता वाचली. सर्व विद्यार्थ्यांना तातडीने आपत्कालीन दरवाजातून बाहेर सुरक्षित काढण्यात आले. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
अचानक झालेल्या या अपघातामुळे विद्यार्थी मात्र भयभीत झाले. काही वेळात चालकाने बस रस्त्यावर सुरक्षित काढली. यानंतर विद्यार्थ्यांसह बस महाबळेश्वरकडे मार्गस्थ झाली. या अपघातामुळे घाटात काही वेळ वाहतूक थांबली होती.