खंबाटकी घाटात चालकाने बस डोलविली!
By admin | Published: September 30, 2015 09:19 PM2015-09-30T21:19:45+5:302015-10-01T00:29:50+5:30
प्रवाशांच्या जिवाशी खेळ : बेदरकार गाडी चालवून आनेवाडी टोलाक्यावरचा रॉड तोडला; कडक कारवाई करण्याची प्रवाशांकडून मागणी
सातारा : सातारा-पुणे विनाथांबा गाडी कात्रज, खंबाटकी घाटातून गाडी बेलगामपणे चालवून प्रवाशांचा जीवाशी खेळ केला. एवढ्यावरही न थांबता त्याने आनेवाडी टोलनाक्यावरील रॉड तोडून नुकसान केले. त्याला सावकाश गाडी चालविण्यास सांगितले तर त्याने प्रवाशांशीच उद्धट वर्तन केले. यामुळे प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे.सातारा आगाराची स्वारगेट ते सातारा ही बस (एमएच १४ बीटी ४२०३) घेऊन चालक आर. जी. शिर्के रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सातारच्या दिशेने निघाले. विनाथांबा बस असल्याने स्वारगेटमधूनच गाडी भरली होती. रांगेत उभे राहून थकलेल्या अनेक प्रवाशांनी गाडी सुरू झाल्यानंतर सुटकेचा नि:श्वास टाकला. परंतु, काही वेळेत काहीतरी गडबड असल्याचे जाणवले.गाडीने कात्रज सोडल्यानंतरच हेलकावे खाण्यास सुरूवात केली. प्रमाणापेक्षा जास्त वेग घेतला असल्याचे पाठीमागे बसलेल्या प्रवाशांच्या लक्षात आले. त्यांनी जावून चालकाला गाडी सावकाश चालविण्याची विनंतीही केली. पण त्याने काही ऐकले नाही. उलट ‘तुम्हाला या गाडीत कोणी बसायला सांगितलं नाही,’ असं म्हणून उद्धट वर्तन केले. चालकाचे मुक्ताफळे एकल्यानंतर आपणच चूक केली, असं वाटू लागल्याने संबंधित प्रवासी जागेवर येऊन बसले.कात्रज आणि खंबाटकी घाटात गाडी दोन वेळा रस्ता सोडून कडेला गेली. वळणावर तरच फारच धोकादायक वळण घेतले. त्यामुळे अपघात होता-होता थोडक्यात वाचले. त्यानंतर सर्वच प्रवाशांचा थरकाप उडाला. महामार्गावरही अनेक वेळा रस्ता सोडून गाडी खाली गेली. चालकाने खरा प्रताप तर पुढेच केला. या प्रवासादरम्यान गाडी जवळून नेल्याच्या कारणावरुन एका कारचालकाशी त्याचे वाद झाले. त्या कार चालकाला धडा शिकविण्यासाठी एसटी सुसाट दामटत आनेवाडी गाठली. टोलनाक्याजवळ गाडी आली तेव्हा नियंत्रण न राहिल्याने तेथील रॉडही तोडला, असा आरोप संबंधित गाडीतून प्रवास करत असलेल्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
कारमधील लोकांना मारहाण
प्रवासात किरकोळ कारणावरुन कारचालकाशी वाद झाला. त्यांना धडा शिकविण्यासाठी एसटी चालकाने गाडी सुसाट पळवत आनेवाडी गाठली. संबंधित चालकाचे गाव आनेवाडीजवळ असल्याने गावातील तरुणांना रस्त्यावर बोलावून थांबण्यास सांगितले. त्यानंतर कारमधील माणसांनाही मारहाण करण्यात आली. यासंदर्भात सातारा बसस्थानकातील नियंत्रण कक्षात बसमधील तीन प्रवाशांनी लेखी तक्रार दिली आहे.