सौसाठी श्रींचे गुडघ्याला बाशिंग !
By Admin | Published: July 17, 2017 02:47 PM2017-07-17T14:47:11+5:302017-07-17T14:47:11+5:30
निवडणुकीचे धुमशान : अनेक गावात मोचेर्बांधणी
आॅनलाईन लोकमत
कऱ्हाड (जि. सातारा), दि. १६ : कऱ्हाड तालुक्यात १७ आॅक्टोबर ते १८ फेब्रुवारी या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने पदासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. सौ साठी श्री आग्रही असल्याचे चित्र अनेक गावांमध्ये दिसत आहे.
कऱ्हाड तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या निवडणूका आॅक्टोंबर २०१७ ते फेब्रवारी २०१८ या कालावधीत होणार आहेत. सदर ग्रामपंचायतीची प्रभाग रचना व आरक्षण प्रसिध्द करण्यात आले आहे. सरपंचपद प्रथमच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने जाहीर केल्यामुळे ग्रामपंचायतीची निवडणूक रंगतदार व चुरशीची होणार आहेत.
सप्टेंबर महिन्यामध्ये या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर हरकती मागविण्यात आल्या असून दि. ३ आॅगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.
आगामी काळात थेट जनतेतून सरपंच निवड होणार असल्याने राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे, शेतकरी संघटना, अपक्ष, विकास आघाड्या इत्यादींना सरपंचपदाची निवडणूक लढविणे सोपे होणार असले तरी संघर्ष करावा लागणार आहे. तर अनेक ठिकाणी इच्छुकांना स्वत:ऐवजी आपल्या सौना रिंगणात उतरावे लागणार आहे. अशावेळी सरपंचपदाचा उमेदवार निश्चित करताना गटप्रमुखांची चांगलीच दमछाक होणार आहे.