नागठाणे परिसरात राजरोसपणे व्यवसाय सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:37 AM2021-05-17T04:37:26+5:302021-05-17T04:37:26+5:30
नागठाणे : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नागठाणे परिसरातील परप्रांतीयांचे ढाब्यांवर मनमानीप्रमाणे राजरोसपणे व्यवसाय सुरू असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यामुळे ...
नागठाणे : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नागठाणे परिसरातील परप्रांतीयांचे ढाब्यांवर मनमानीप्रमाणे राजरोसपणे व्यवसाय सुरू असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यामुळे शासकीय नियमांची पायमल्ली होण्याबरोबरच कोरोनाला निमंत्रण मिळत आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नागठाणे परिसरात बोरगाव पोलीस ठाणे हद्दीत नागठाणे ते काशीळपर्यंत परप्रांतीय व्यक्तींचे काही ढाबे आहेत. सध्याचे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे जिल्हाभर कडक लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. तरीही या ढाब्यांवर प्रशासनाचा आदेश धुडकावून मनमानी पद्धतीने, तसेच राजरोसपणे हॉटेलमध्ये प्रवाशांना जेवण दिले जात आहे. तसेच हॉटेल मालकांकडून इतर सोयीची पूर्तताही केली जात असून, पडद्यामागून इतर दोन नंबर व्यवसायही राजरोसपणे चालविले जात आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
पोलीस प्रशासनाकडे अजिबात लक्ष नसल्यामुळे बेधडकपणे हे व्यवसाय चालविले जात आहेत. यामध्ये प्रशासनाचेही तेवढेच सहकार्य आहे का, अशी प्रतिक्रिया नागठाणे पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये उमटू लागली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील इतर स्थानिक मराठी हॉटेल व्यावसायिकांवर पोलीस प्रशासन नियमाप्रमाणे कारवाईचा बडगा उभारत असून, प्रसंगी त्यांच्यावर गुन्हेही दाखल केले जात आहेत. परंतु, या परप्रांतीयांचे हॉटेलमध्ये चाललेले हे सर्व व्यवसाय पोलीस प्रशासन कसे चालवू देत आहेत, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहेत. तसेच उलटसुलट चर्चांना उधाण आला आहे. या परप्रांतीय हॉटेल मालक बेधडकपणे राजरोसपणे भरदिवसा हॉटेलमधील आतल्या खोलीमध्ये, तसेच रात्री उशिरापर्यंत हॉटेलची बाहेरील लाईट बंद करून शटर बंद करून आतमध्ये मनमानी प्रमाणे पाहिजे तो व्यवसाय चालवीत असून, याची साधी माहिती दोन कि.मी. अंतरावर असलेल्या पोलिसांना नाही.