भोसगावला साकारतंय फुलपाखरू उद्यान
By admin | Published: May 29, 2015 09:57 PM2015-05-29T21:57:37+5:302015-05-29T23:58:12+5:30
राज्यात पहिलाच प्रकल्प : वांग खोऱ्यातील पर्यटन विकासाला चालना
सणबूर : भोसगाव, ता. पाटण येथे निसर्गाच्या कुशीत पहिले फुलपाखरू उद्यान साकारत आहे. सध्या या उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही दिवसांतच हे उद्यान पर्यटकांसह अभ्यासकांसाठी खुले होणार आहे. सध्या निसर्ग पर्यटन केंद्रामध्ये पर्यटकांची गर्दी वाढताना दिसत आहे. वांग खोऱ्यातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने हे पहिले पाऊल समजले जात आहे.
भोसगाव येथील वनविश्रामगृहाच्या बाजूला हे निसर्ग पर्यटन केंद्र साकारण्यात येत आहे. यासाठी सुमारे १ कोटी रूपये खर्च अपेक्षीत आहे. वनविभागने यासाठी मंजूरी दिली आहे. त्यातूनच निसर्ग पर्यटन केंद्राचे काम वेगाने सुरू आहे. या केंद्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरू उद्यान हे मुख्य वैशिष्ठ्य असणार आहे. त्याचबरोबर पश्चिम घाटातील दुर्मिळ जैवविविधतेची माहिती या पर्यटन केंद्रामध्ये प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर वन्य प्र्राण्यांची शिल्पे, विविध वनस्पतींचे जतन या केंद्रामध्ये करण्यात येणार आहे. भोसगाव येथील वनदक्षता समितीची या केंद्रावर निगराणी असणार आहे.
पावसाळ्यात निसर्ग केंद्राचे खरे सौंदर्य पर्यटकांना पहावयास मिळणार आहे. भविष्यात येथील पर्यटन केंद्रामध्ये अभ्यासक व पर्यटाकांचा मोठा ओढा वाढणार आहे. वांग खोऱ्यातील पर्यटन विकासाच्या अनुषंगाने हे पहिले पाऊल समजले जात आहे. यामुळे छोट्या व्यवसायांना चालना मिळणार आहे. (वार्ताहर)