गायी विकत घेऊ, दूध विकू, नुसतीच आमिष दाखवून मसाला विक्रेत्याची ४ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 11:56 PM2021-10-10T23:56:14+5:302021-10-11T00:00:03+5:30
स्वप्नील नारायण कुलकर्णी (रा. महागाव, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
सातारा: गायी विकत घेऊ, त्याचे पालन पोषण करू, दूध विक्रीतून आलेले पैसेही देतो, अशी नुसतीच आमिषदे दाखवून सदर बझारमधील एका मसालाविक्रेत्याची तब्बल ४ लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
स्वप्नील नारायण कुलकर्णी (रा. महागाव, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हेमंतकुमार प्रल्हाद जिरेसाळ (वय ६१, रा. योजनानगर को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, केबीपी कॉलेजजवळ, सदरबझार, सातारा) हे मसालाविक्रेते आहेत. स्वप्नील कुलकर्णी (रा. महागांव, ता. सातारा) याने हेमंतकुमार आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांसाठी आपण नऊ गीर गायी विकत घेऊ आणि आपण त्यांचे पालनपोषण करू, त्याच्या दूध विक्रीतून मी तुम्हाला दरमहा २७ हजार रुपये देतो, असे सांगितले. त्यानंतर जिरेसाळ यांच्याकडून ३ लाख ४५ हजार रुपये घेतले. तसेच दोन महिन्याचे घरभाड्याचे पैसे असे सर्वमिळून ४ लाख १४ हजार रुपये न देता त्यांची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर जिरेसाळ यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात याची तक्रार दिली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप मोरे हे करत आहेत.