फायनान्सच्या कर्जातून केला ट्रक खरेदी, हप्ते न फेडताच केली परस्पर विक्री; एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 03:58 PM2022-02-05T15:58:40+5:302022-02-05T16:14:08+5:30
याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल
सातारा : फायनान्सच्या कर्जातून ट्रक खरेदी करून त्याचे हप्त न फेडता ट्रक परस्पर दुसऱ्याला विकल्याचे समोर आले असून, याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. उन्मेश उल्हास शिर्के (रा. निरा, ता. पुरंदर, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्यातील जिल्हा परिषदेजवळ एका कंपनीचे फायनान्सचे कार्यालय आहे. या फायनान्समधून उन्मेश शिर्के याने उर्वरित राहिलेले हप्ते भरण्याचा करार करून संबंधित फायनान्स कंपनीकडून ट्रक ताब्यात घेतला. मात्र, हप्ते न भरल्याने १२ लाख ७२ हजार २१८ रुपयांची थकबाकी त्याच्याकडे असताना त्याने परस्पर ट्रक दुसऱ्याला विकला.
हा प्रकार समोर आल्यानंतर फायनान्सचे कर्मचारी सचिन चव्हाण यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी उन्मेश शिर्केवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास हवालदार डी.डी. इंगवले हे करीत आहेत.