चोरीचे सोने खरेदी; सराफासह दोेघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:18 PM2018-09-07T23:18:15+5:302018-09-07T23:18:19+5:30
सातारा : शहरातील बुधवार पेठेत तीन दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, चोरीचे सोने विक्री व खरेदी केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यामध्ये साताऱ्यातील एका ज्वेलर्सच्या मालकाचा समावेश आहे.
ज्वेलर्स मालक मोतीलाल जेठमल जैन (वय ५९, शनिवार पेठ, सातारा), सुरेखा सुभाष पवार (४०, आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, सोमवारी दुपारी बुधवार पेठेतील शकील इस्माईल बन्ने यांच्या बंद बंगल्याचा पाठीमागील दरवाजा तोडून चोरट्यांनी घरातील एक लाख ६२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून या चोरीचा अवघ्या तीन दिवसांत छडा लावला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचे ४० ग्रॅम सोने व १४१ ग्रॅम चांदी असा एकूण ८३ हजार ४०० रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यातील एका मुलाने चोरी करून आणलेली सोन्याची बांगडी आपल्या आईला दिल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलाच्या आईकडे आपला मोर्चा वळविला. सुरेखा पवार हिच्याकडे पोलिसांनी तपास केल्यानंतर यामध्ये आणखी नवी माहिती समोर आली. पवार हिने सोन्याची बांगडी मोतीलाल जेठमल जैन यांच्या ‘गुलाबजी हिंदुजी ज्वेलर्स’ या दुकानात विकून नवीन सोने खरेदी केल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी ज्वेलर्स मालक मोतीलाल जैनलाही अटक केली.
सुरेखा पवारकडून १० ग्रॅमचे ३१ हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार, पोलीस नाईक प्रवीण गोरे, लैलेश फडतरे, संतोष लेंभे, श्रीनिवास देशमुख, अमित माने, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, धीरज बेसके, प्रीती माने यांनी सहभाग घेतला.
याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नसीमखान फरास करीत आहेत.
मुलाच्या गुन्ह्यांवर आईकडून पांघरूण
संबंधित दहा वर्षांची दोन मुले साताºयातील एका शाळेत शिकत आहेत. त्यांनी सराईतपणे बंद बंगला फोडून दागिने चोरले. त्यातील एका मुलाने घरी गेल्यानंतर दप्तरामध्ये दागिने लपवून ठेवले होते. हे दागिने कोठून आणले, हे विचारणे सोडून आईने त्याच्या कृत्यावर पांघरूण घालून त्याच्याकडील सोन्याची बांगडी आपल्याजवळ ठेवली. एवढेच नव्हे तर दागिन्यांचा मोह न आवरल्याने आईने त्या सोन्याच्या बांगडीच्या बदल्यात स्वत:ला नवे दागिने केले. मुलाला दाटण्याचे सोडून आईने मोहापायी स्वत:लाही गैरकृत्यात सामील करून घेतल्याने पोलीसही अवाक् झाले.