खरेदी तुमची... दिवाळी आमची !
By admin | Published: October 18, 2016 10:32 PM2016-10-18T22:32:14+5:302016-10-18T22:32:14+5:30
सातारकरांनो सावधान : दिवासाढवळ्या फ्लॅटमध्ये होतेय चोरी; खबरदारी घेण्याचे पोलिसांचे आवाहन
सातारा : दिवाळीची चाहूल लागल्यानंतर नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत. याच संधीचा मुहूर्त साधून चोरट्यांनी बंद फ्लॅट टार्गेट केले असून, काही क्षणातच दिवसाढवळ्या घरातील ऐवजावर डल्ला मारला जात असल्याचे प्रकार शहरात वाढत आहेत. विशेषत: महिलांनी घराबाहेर जाताना शेजाऱ्यांना सांगून बाहेर पडावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दिवाळीच्या धामधुमीमध्ये सर्वजण व्यस्त असतात. काहीजण खरेदीसाठी दिवसभर बाहेर असतात तर काहीजण परगावी जात असतात. त्यामुळे बारा ते चोवीस तास घरांना कुलपे असतात. याच संधीचा फायदा चोरटे पुरेपूर उठवत आहेत. अपार्टमेंटमध्ये रात्री अन् दिवसा शहरात बंद बंगले, फ्लॅट किती आहेत, हे चोरटे हेरत असतात. त्यानंतर पाळत ठेवून दिवसाढवळ्या संबंधित फ्लॅटमध्ये चोरी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटना वाढत असून, त्यामुळे पोलिसांची डोकेदुखीही वाढली
आहे. प्रत्येक फ्लॅटच्या बाहेर पोलिसांना बंदोबस्त लावणे शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरात चोरी होऊ नये म्हणून स्वत: काळजी घेतली पाहिजे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
विसावा नाका, सत्वशील नगर, भू-विकास बँक परिसर, शाहूपुरी या ठिकाणी आत्तापर्यंत दिवसाढवळ्या बंद फ्लॅट फोडण्यात आले आहेत. यातील काहीजण दिवाळीची खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले होते, असे पोलिसांनी सांगितले.
या घटनांनमध्ये दागिन्यांसह रोकड य घरातील मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. दरवर्षी दिवाळीच्या कालावधीमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे नागरिकांनीच सतर्क राहायला हवं, असं पोलिसांचं म्हणणे आहे. नागरिकांनी घरातून बाहेर जाताना सुरक्षेची योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. (प्रतिनिधी)
गार्डन सिटीमध्ये दिवसा चोरी
येथील नकाशपुरातील गार्डन सिटीमध्ये राहणाऱ्या अस्मिता संजय खडसे यांचा दि. १४ रोजी भरदुपारी अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडला. खडसे या काही कामानिमित्त दुपारी बारा वाजता बाहेर गेल्या होत्या. दुपारी चार वाजता त्या परत आल्या त्यावेळी त्यांच्या घरातून साठ हजारांची रोकड चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
काय काळजी घ्याल...
४सेफ्टी दरवाजा बसवावा.
४बाहेर जाताना शेजाऱ्यांना कल्पना द्यावी. ४घरात दागिने, रोकड ठेवू नये. ४अलार्म सिस्टीम बसवावी.
४अपार्टमेंटमध्ये सुरक्षा रक्षक नेमावेत.
४सेल्समनला इमारतीच्या आवारात प्रवेश देऊ नये.
४संशयित दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.