कामगारानेच घात केला; विक्रेत्याचे साडेतीन लाख लंपास
By नितीन काळेल | Published: March 8, 2024 12:59 PM2024-03-08T12:59:13+5:302024-03-08T13:00:17+5:30
सातारा : साताऱ्यात घराचे कुलूप तोडून ब्लॅंकेट विक्रेत्याच्या कामगारानेच सुमारे साडे तीन लाख रुपयांची रक्कम चोरून नेली. याप्रकरणी उत्तर ...
सातारा : साताऱ्यात घराचे कुलूप तोडून ब्लॅंकेट विक्रेत्याच्या कामगारानेच सुमारे साडे तीन लाख रुपयांची रक्कम चोरून नेली. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील कामगाराविरोधात शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी अरशद मोहम्मदअली झोजा (वय ४०, रा. मंगळवार पेठ, सातारा. मूळ रा. कमहेडा, ता. जि. मुजफ्फरनगर, उत्तरप्रदेश) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार शेरखान ताजअली (रा.दखेडी, ता. मुजफ्फरनगर, उत्तरप्रदेश) याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. गेल्यावर्षी दि. २१ आॅक्टोबर रोजी साताऱ्यातही ही घटना घडली होती. मात्र, ही घटना घडल्यानंतर तक्रारदार गावी गेले होते. साताऱ्यात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदविला.
या प्रकरणातील अरशद झोजा हे ब्लॅंकेट विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे संशयित शेरखान ताजअली कामगार होता. तक्रारदार घरी नसल्याचे पाहून त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर त्याने घरातील पिशवीत ठवेलेली ३ लाख ५० हजार ६०० रुपयांची रक्कम चोरुन नेली. यामध्ये ५००, २००, १०० आणि ५० रुपयांच्या नोटा होत्या. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली.
सातारा शहर पोलिस ठाण्यात नोकर चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक ढेरे हे तपास करीत आहेत.