देशातील सीएए, एनआरसी कायदा रद्द करा ! क-हाडात सर्वधर्मीयांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 07:01 PM2020-01-20T19:01:01+5:302020-01-20T19:04:12+5:30
देशाच्या ऐक्यास व अखंडतेस या कायद्यामुळे तडा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ताबडतोब सीएए व एनआरसी हे कायदे रद्द करावेत व राज्य सरकारने हे कायदे महाराष्ट्रात लागू होऊ देऊ नये, अशी मागणी यावेळी सर्वपक्षीय संघटनांच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
क-हाड : भारतात केंद्र सरकारने नागरिकत्व संशोधन कायदा व नॅशनल रजिस्टर आॅफ सिटीझन (एनआरसी) असे कायदे संसदेत बहुमताच्या जोरावर पारित केले आहेत. संबंधित कायदे हे स्पष्टपणे धर्मावर आधारित भेदभाव करणारे आहेत. या कायद्यांमुळे संविधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वाला धक्का पोहोचत आहे. त्यामुळे देशातील सीएए, एनआरसी कायदा रद्द करावेत, अशी मागणी करीत क-हाडात सोमवारी एमआयएम, भीम आर्मी, एनएसयूआयसह सर्वधर्मीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला.
संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने एनआरसी व सीएए कायदा रद्द करण्याबाबत मागणीचे निवेदन तहसीलदार अमरदीप वाकडे यांना देण्यात आले. यावेळी पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, क्राईम ब्रँचचे अशोक चौहान उपस्थित होते.
यावेळी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ शिकलगार, एनएसयूआयचे शिवराज मोरे, भीम आर्मीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जावेद नायकवडी, जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे, नगरसेवक फारूक पटवेकर, अख्तर आंबेकरी, इसाक सवार, अनिल पाटील, आनंद लादे आदींसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने महिला, पुरुष सहभागी झाले होते.
यावेळी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतात केंद्र सरकारने नागरिकत्व संशोधन कायदा व नॅशनल रजिस्टर आॅफ सिटीझन (एनआरसी) असे कायदे संसदेत बहुमताच्या जोरावर पारित केले आहेत. या कायद्याला देशात अनेक ठिकाणी तीव्र विरोध होत आहे. केंद्र सरकार हुकूमशाही पद्धतीने देशात हा कायदा लादण्याचा प्रयत्न करीत आहे. काही राज्यांनी त्यांच्या राज्यात हे कायदे लागू करण्यास स्पष्ट नकार दर्शविला आहे. देशाच्या ऐक्यास व अखंडतेस या कायद्यामुळे तडा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ताबडतोब सीएए व एनआरसी हे कायदे रद्द करावेत व राज्य सरकारने हे कायदे महाराष्ट्रात लागू होऊ देऊ नये, अशी मागणी यावेळी सर्वपक्षीय संघटनांच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
दरम्यान, क-हाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून निषेध रॅलीस प्रारंभ झाला. रॅली मंगळवार पेठमार्गे, कन्याशाळा, चावडी चौक, आझाद चौक, दत्त चौकमार्गे नवीन प्रशासकीय इमारतपर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने एनएसयूआय, एमआयएम, भीम आर्मी आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला, पुरुष सहभागी झाले होते.
- पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
क-हाड शहरात सीएए व एनआरसी कायद्याच्या निषेधार्थ सर्वधर्मीय संघटनांच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव, महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चातील सहभागी झालेल्यांची संख्या पाहता कोणताही अनुचित प्र्रकार घडू नये, म्हणून पोलिसांच्यावतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.