भजनाला बोलावलं; भोजनाला बसवलं..!

By admin | Published: October 6, 2014 10:06 PM2014-10-06T22:06:30+5:302014-10-06T22:40:25+5:30

घडतंय-बिघडतंय : खुसखुशीत मेजवानीला राजकीय वास

Called Bhajan; It was a meal! | भजनाला बोलावलं; भोजनाला बसवलं..!

भजनाला बोलावलं; भोजनाला बसवलं..!

Next

प्रमोद सुकरे - कऱ्हाड -शहरातील भजनी मंडळांचा एकत्र कार्यक्रम म्हणून साऱ्यांना निमंत्रण धाडलं; एका आलिशान हॉटेलच्या लॉनवर भजनी जमलेदेखील; पण कुठले भजन अन कुठले काय! चर्चा सुरू झाली अन भजन्यांना थेट भोजनाला बसायला सांगितलं. मात्र, या खुसखुशीत मेजवानीला राजकीय वास आल्याने अनेकांनी तेथून ‘कलटी मारणे’च पसंत केले.
एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तशी निमंत्रणं शहरभागातील भजनी मंडळांना गेली होती. त्यामुळे भजनी मंडळाचे कार्यकर्ते गटागटाने एकत्र आले. हॉटेलच्या हिरवळीवर आता भक्तीसांगीताचा कार्यक्रम सुरू होईल, असे वाटत होते. मात्र तबला, पेटी अन टाळ घेऊन जमलेल्यांवर पाळत ठेवून असलेले राजकीय कार्यकर्ते तेथे आले. त्यांनी चर्चा करत-करतच ‘आता भोजनाला बसा,’ असं सर्वांना सांगितलं; पण त्या जेवणाला अनेकांना राजकीय वास आला.
‘उद्या पुन्हा आमुक-तमुक लॉन्सवर जमूया भजनी मंडळाच्या मेळाव्यात. आपला मेळ घालू या,’ असं म्हणणाऱ्यांचा हा खेळ कशासाठी चाललाय हे समजायला उपस्थितांना वेळ लागला नाही. खुसखुशीत मेजवानीला राजकीय वास असल्याची कुजबूज मग महिलांच्यात सुरू झाली. अनेक पुरूष मंडळींमध्ये त्याची दबक्या आवाजात चर्चाही होऊ लागली.
ज्यांनी कोणी एका उमेदवारासाठी हा उपद््व्याप केला होता, त्यांची मोहीम फत्ते झाली खरी; पण हजर उमेदवारांच्या प्रेमात पडलेल्या काही भजनी कार्यकर्त्यांची गोची झाली. काहींनी मग जेवण केलं; पण त्यांना ते पचनी पडले नाही. काहींनी न जेवताच ‘कलटी मारणे’ पसंत केले. या मेजवानीची खुसखुशीत चर्चा मात्र शहरभरात जोरदारपणे सुरू आहे.

Web Title: Called Bhajan; It was a meal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.