मोकाटहुन आले अन निमूटपणे गेले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:04 AM2021-05-05T05:04:51+5:302021-05-05T05:04:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : रस्त्यावर विनाकारण फिरू नका, असे वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले जात असल्याने पोलिसांनी अखेर मंगळवारपासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : रस्त्यावर विनाकारण फिरू नका, असे वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले जात असल्याने पोलिसांनी अखेर मंगळवारपासून वाहन जप्तीची मोहीम सुरू केली. दिवसभरात पोलिसांनी एकूण ६३ वाहने जप्त केली असून, मोकाट होऊन आलेल्या वाहनचालकांना निमूटपणे पायी घरी चालत जाण्याची वेळ आली.
शहरात दिवसेंदिवस संसर्ग वाढीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे काम नसल्यास घराबाहेर पडू नका, नियम पाळा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत होते. मात्र, शेवटी प्रशासनाने सात दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे अत्यावश्यक सेवांना घरपोहोचसाठी परवानगी सोडल्यास सगळे बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, तरीही सकाळी शहरात रस्त्यावर वाहने घेऊन लोक फिरत होते. त्यामुळे सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह विविध ठिकाणी तपासणी केंद्रे उभारली.
शहरातील मोती चौक, पोवई नाका, समर्थ मंदिर, बोगदा, वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट, मोळाचा ओढा या ठिकाणांचा यामध्ये समावेश होता. यावेळी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या लोकांची पोलिसांनी वाहने जप्त केली. ज्यांचे कारण खोटे होते, काही काम नसताना जे लोक बाहेर आले, त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. यातून चारचाकी वाहनधारकही सुटले नाहीत. पोलिसांनी कारसुद्धा जप्त केल्या आहेत. दुपारी बारानंतर शहरातील सगळ्या रस्त्यांवरील वाहने हळूहळू गायब होऊ लागली. ही जप्त केलेली वाहने पोलीस कवायत मैदानावर लावण्यात आली आहेत.
चौकट :
सातारकरांनो, जनता कर्फ्यू पाळा
सातारा शहरात वाढत असलेली बाधितांची संख्या गंभीर आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या सातारा शहर परिसरासह तालुक्याला कोरोनामुक्तीकडे नेण्यासाठी सर्वांनी कठोरपणे नियम पाळण्याची वेळ आली आहे. सातारकरांनी आता स्वतःहून जनता कर्फ्यू पाळून ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
कोरोना संसर्ग साखळ्या तुटल्याशिवाय संकटातून सुटका होणार नाही. काही दिवस तर सातारकरांनी अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेरच पडू नये.
चौकट:
भाजीविक्रेत्यांची जनजागृती!
प्रशासनाने मंगळवारपासून लॉकडाऊन सुरू केल्यानंतर दुकाने कडकडीत बंद ठेवून व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काही नागरिकांना लॉकडाऊनबाबत माहिती नव्हती, त्यांना त्याबाबत संपूर्ण माहिती पोलिसांकडून देण्यात आली. ज्या ठिकाणी भाजीविक्री केली जात होती, त्या ठिकाणी पोलिसांनी प्रत्यक्ष जाऊन त्यांच्यामध्ये जनजागृती केली.
मंगळवारी सकाळपासूनच रस्त्यावर विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्या वाहनचालकांवर धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून, रस्त्यावर विनाकारण फिरू नये, असे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.
चौकट:
विसावा नाक्यावर २० पेक्षा अधिक दुचाकी जप्त
महामार्गावरील बॉम्बे रेस्टॉरंट चौक हा नेहमीच गजबजलेला दिसून येतो. जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा प्रमुख महामार्ग आणि चौकात असणारी व्यापारपेठ पाहता या ठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहनांची नेहमीच मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू असते. लॉकडाऊन सुरू करूनही मंगळवारी सकाळी या चौकात मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ सुरू झाल्यामुळे या ठिकाणी तैनात केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी २० पेक्षा अधिक दुचाकी वाहने जप्त करत पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारला.
चौकट:
खोटे कारण सांगणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल
अनेकजण सध्या खोटी कारणे सांगून घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे संबंधित वाहनधारकांनी सांगितलेल्या कारणांची पोलीस शहानिशा करणार आहेत. ज्यांचे खोटे कारण आढळून येईल, त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिला आहे.
पाटील म्हणाले, लॉकडाऊनबाबत जिल्ह्यात कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाने विहीत वेळेत जीवनावश्यक वस्तू घरपोच पोहोचविण्याची सुविधा निर्माण करून दिल्यामुळे आता केवळ रुग्णालय, मेडिकलच्या कारणांशिवाय आणि अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या नागरिकांनाच घराबाहेर पडता येईल.