काळुबाई मंदिरात कॅमेरे अन् घाटात क्रेन
By Admin | Published: December 9, 2015 01:16 AM2015-12-09T01:16:48+5:302015-12-09T01:16:48+5:30
मांढरदेव यात्रा : नियोजन बैठकीत प्रशासनाने घेतला तयारीचा आढावा
वाई : मांढरदेव यात्रेत राज्य व राज्याबाहेरून हजारो भाविक येत असतात. यात्रेच्या काळात अचानक भाविक आणि वाहनांची संख्या वाढल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर यंदाच्या मांढरदेव यात्रेत मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि घाटातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी क्रेन ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवीची यात्रा दि. २३, २४ व २५ जानेवारी दरम्यान होत आहे. यात्रेच्या नियोजनाबाबत मंगळवारी वाई पंचायत समितीमधील देशभक्त किसन वीर सभागृहात सर्व यंत्रणांची आढावा बैठक बोलाविण्यात आली होती.
यावेळी पोलीस उपअधीक्षक दीपक हुंबरे, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार सदाशिव पडदुने, भोरच्या तहसीलदार वर्षा शिंगण, गटविकास अधिकारी दीपा बापट, खंडाळ्याचे गटविकास अधिकारी विलास साबळे आदी उपस्थित होते.
बैठकीत विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. आरोग्यविभागातर्फे दोन सत्रात चार पथके, जिल्हा रुग्णालयामार्फत तीन अशा पथकांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप यादव यांनी दिली.
जिल्हा परिषद आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालयामार्फत औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करावा. रक्तपुरवठा तत्काळ उपलब्ध होईल तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये किमान पाच खाटा राखीव ठेवाव्यात.
ग्रामपंचायतीमार्फत पाण्याचे शुध्दीकरण, तात्पुरत्या शौचालयांची उपलब्धता, जंतूनाशक औषध फवारणी, त्याचबरोबर रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही याबाबत उपाययोजना करण्यात येत आहेत. कचरा होऊ नये यासाठी दर्शन मार्गावर जागोजागी कचरा कुंड्या ठेवण्यात येणार आहेत.
ग्रामपंचायतीने यात्रा काळात येणारे स्टॉलधारक यांना कर आकारणी करावी. खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी ठराविक ठिकाणी होऊ नये यादृष्टीने स्टॉल धारकांच्या जागांचे नियमन करावे. अन्न धान्यांच्या स्टॉलला परवानगी देतांना अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना घेणे बंधनकारक करावे.
तहसीलदार पडदुने म्हणाले, ‘सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची व्यवस्था उत्तम राहिल यासाठी सतर्क राहावे. वाहतुकीची कोंडी होणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत योग्य ती दक्षता घेण्यात यावी, सर्व विभागांनी यात्रा कालावधीत जबाबदारीने काम करावे, हलगर्जीपणा झाल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईला सामोरे जावे लागेल याची दक्षताही घ्यावी अशा सूचना केल्या.
राज्य परिवहन विभागामार्फत मांढरदेव येथे जादा बसेसची सोय तसेच घाटात क्रेनची सुविधा आणि आवश्यक कर्मचारी यांची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे यात्रा शांतते व सुरळीत पार पडण्यासाठी मदत होणार आहे. (प्रतिनिधी)