प्रधानमंत्री आवाससाठी पाटण येथे उद्या शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:37 AM2021-01-20T04:37:43+5:302021-01-20T04:37:43+5:30
रामापूर : प्रधानमंत्री आवास योजना शहरीअंतर्गत पाटण नगरपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्र शासन व राज्य शासन ...
रामापूर : प्रधानमंत्री आवास योजना शहरीअंतर्गत पाटण नगरपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडून घरकुल बांधण्यासाठी अडीच लाख रुपयांचा निधी देण्यात येत असतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाटणमधील इच्छुकांनी नगरपंचायतीत अर्ज करावा, असे आवाहन नगराध्यक्ष अजय कवडे यांनी केले आहे. या योजनेच्या अटी, शर्ती व आवश्यक कागदपत्रांच्या माहितीविषयी गुरुवार, दि. २१ रोजी सकाळी ११ वाजता रणजितसिंह पाटणकर सभागृहात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
चव्हाण पतसंस्थेकडून दुचाकीचे वितरण
सणबूर : आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या कऱ्हाडमधील रविवार पेठ शाखेच्या वतीने कार्वेनाका येथील फर्जाना जावेद शिकलगार यांना दुचाकीचे वितरण करण्यात आले. यावेळी शाखा सल्लागार आझाद मुलानी, शाखाप्रमुख समीर शिकलगार, रोहित माने, सूर्यकांत काळे उपस्थित होते.
कऱ्हाडला बापूजी साळुंखे कॉलेजमध्ये हरित शपथ
कऱ्हाड : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात ‘माझी वसुंधरा’ कार्यक्रम झाला. त्याअंतर्गत विद्यार्थी व प्राध्यापकांना हरित शपथ देण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश घाटगे होते. प्राचार्य घाटगे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर पर्यावरणाचे संवर्धन होणे काळाची गरज असल्याचे सांगून या अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण कसे होईल, याबाबत विचार मांडले. पर्यवेक्षक प्रा. पी. डी. पाटील यांनी हरित शपथ दिली. सुभाष कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. उपप्राचार्य मोहन पाटील, अण्णासाहेब पाटील, सचिन बोलाईकर, सुरेश यादव यांची यावेळी उपस्थिती होती.
वाल्मीक विद्यामंदिरात विविध कार्यक्रम
तळमावले : येथील वाल्मीक विद्यामंदिरमध्ये मुख्याध्यापक श्रीनिवास वाळवेकर व ज्येष्ठ शिक्षक पी. एस. काशीद यांच्या मार्गदर्शनानुसार स्वामी विवेकानंद सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत विविध कार्यक्रम झाले. वाल्मीक विद्यामंदिरात प्राचार्य अरुण गाडे यांचे व्याख्यान झाले. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार यांच्या हस्ते झाले. सप्ताहाचा समारोप केंद्रप्रमुख उत्तमराव घाडगे यांच्या उपस्थितीत काव्यवाचन स्पर्धेने झाला. सप्ताहात वक्तृत्व, निबंध, कथाकथन, चित्रकला, रांगोळी आदी स्पर्धांचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व पारितोषिक दिले जाणार आहे. प्रथम तीन स्पर्धकांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी होणार आहे.
मंगल खंडागळे यांचा निवडीबद्दल सत्कार
सणबूर : कऱ्हाड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मंगल खंडागळे यांचा माजी जिल्हा परिषद सदस्या मंदाकिनी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय काँग्रेसचे नेते हिंदुराव पाटील, माजी सभापती मधुकर पाटील, शंकर मोहिते, कुमार यादव, विठ्ठल खंडागळे यांची यावेळी उपस्थिती होती. शिक्षक म्हणून चांगले काम करता आले. सर्वांच्या सहकार्याने बँकेत काम करण्याची संधी मिळाली. ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडील, अशी ग्वाही मंगला खंडागळे यांनी यावेळी दिली.