कालवा भरला...अन् विहिरी आटल्या!
By Admin | Published: January 6, 2017 11:11 PM2017-01-06T23:11:35+5:302017-01-06T23:11:35+5:30
आदर्कीत विरोधाभास : धोम-बलकवडी उजव्या कालव्याचे अस्तरीकरण करण्याची मागणी
सूर्यकांत निंबाळकर ल्ल आदर्की
आदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागास वरदान ठरणाऱ्या धोम-बलकवडी कालव्यात सालपे ते बिबीपर्यंतचे नैसर्गिक पाणी पाझरत असल्याने दहा किलोमीटर कालवा पाण्याने भरला आहे. त्याचा परिणाम विहिरीतील पाण्यावर झाल्यामुळे ‘कालवा भरला अन् विहिरी आटल्या’ असा विरोधाभास निर्माण झाला आहे. विहिरीतील पाणीसाठा टिकून राहावा, यासाठी कालव्याचे तत्काळ अस्तरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
माजी आमदार शिवाजीराजे नाईक-निंबाळकर, कृष्णचंद्र भोईटे, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार चिमणराव कदम यांनी ‘कृष्णेचे पाणी दुष्काळी भागाला मिळवून देणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना करून शासनाच्या पटलावर पाणी प्रश्न सतत लावून धरला. त्यानंतर काँग्रेसची सत्ता १९९५ जाऊन भाजप-शिवसेना युती शासन अपक्षाच्या पाठिंब्यावर सत्तेत आले. यानंतर रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून धोम-बलकवडी प्रकल्पास मंजुरी मिळून धरणाच्या कामास सुरुवात झाली.
धोम-बलकवडी उजव्या कालव्याचे फलटण, खंडाळा तालुक्यात सर्वेक्षण झाले. त्यानंतर कालव्याचे फेर सर्वेक्षण होऊन सालपे ते आळजापूरपर्यंत ५०० ते १००० मीटर कालवा गावाजवळून घेण्यात आला. त्यामुळे पाझर तलाव, नाला बांध, सिमेंट बंधारे कालव्याच्या वरील बाजूस राहिले. तर कालवा जमिनीपासून २० ते ४० फूट खोलीवरून गेल्यामुळे ओढा-नाल्याचे पाणी कालव्यात पाझरू लागले. याचा परिणाम विहिरींच्या पाणीपातळीवर झाल्याचे दिसून येत आहे. सध्या कालव्यात पाणी असून विहिरी कोरड्या पडल्या आहेत. विहिरीतील पाणीसाठा टिकून रहावा, यासाठी कालव्याचे अस्तरीकरण करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
उपाययोजनेची गरज
आदर्कीसह परिसरातील अनेक विहिरी उन्हाळ सुरू होण्यापूर्वीच कोरड्या पडल्या आहेत. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत सुरू असले तरी कालव्याची खोली अधिक असल्याने हे पाणी विहिरींऐवजी कालव्यात पाझरत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने कालव्याचे अस्तरीकरण केल्यास हे संकट टळू शकते, असे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.