कालव्यातील पायऱ्या सर्व्हेत गायब...
By Admin | Published: December 17, 2015 10:31 PM2015-12-17T22:31:45+5:302015-12-17T22:54:12+5:30
सातारा : सदरबझारमधील नागरिक काम बंद पाडण्याच्या पवित्र्यात
सातारा : सदर बझार येथील कण्हेर उजव्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. दर्गा जवळील पुलालगत असलेल्या कालव्यातील दोन्ही बाजूंच्या पायऱ्या मुकादमाच्या सर्व्हेत नसल्याने दुरुस्तीत त्या गायब झाल्या आहेत. ही बाब निदर्शनास येताच नागरिकांनी त्याबाबत विचारणा केली. त्यावर संबंधितांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने नागरिकांनी काम बंद पाडण्याचा पवित्रा घेतला आहे. येथील सदर बझारमधील दर्गा पुलापासून लक्ष्मी टेकडीपर्यंत कालवा दुरुस्तीचे काम पाटबंधारे विभागाने हाती घेतले आहे. मागील अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिकांनी कालव्याच्या गळती बद्दल दुरुस्तीची मागणी केली होती. त्यानुसार दुरुस्तीचे काम मुकादमाच्या देखरेखीखाली सुरू आहे. यावेळी येथील दोन्ही बाजंूच्या पायऱ्या काढून प्लास्टर करण्यात आले. ही बाब काही महिलांनी संबंधितांना सांगितली.परंतु त्याकडे दुर्लक्ष करत काम सुरूच ठेवण्यात आले. त्यानंतर सदर बझार येथील काही नागरिकांनीही या पायरी विषयी विचारले असता मुकादमाने सांगितले की मी जवळ पास १९८० सालापासून या कालव्याचा सर्व्हे करत असून, या ठिकाणी पायऱ्याच नव्हत्या. त्यामुळे नागरिकही चांगलेच चक्रावले. त्यानंतर नागरिकांनी पायऱ्या असल्याचे पुरावे दाखवण्यास संमती दाखवली असता मुकादमाने संबंधित कार्यालयात व ठेकेदाराला फोन करून हात वर केले.
पायऱ्याबाबत झालेला सर्व्हे चुकीचा असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु याला कोणीही जुमानत नसल्याने एकमेकाकडे टोलवा-टोलवी सुरू होती. शेवटी नागरिकांनी काम बंद पाडण्याचा इशारा देताच
पायऱ्या करण्याचे आश्वासन दिले गेले.
दरम्यान, या परिसरातील लोकसंख्येचा विचार करता कालव्याच्या सुरुवातीपासून पायऱ्या करण्यात आल्या होत्या. त्याचा फायदा देखील येथील नागरिकांना होत आहे. उन्हाळ्यात अगदी वापरण्यासाठी पाणी देखील या कालव्यातून नागरिक घेत असतात. जनावरेही पाणी पिण्यासाठी याच पायऱ्याचा वापर करत असतात. त्यामुळे मुकादमाने केलेला हा सर्व्हे किती योग्य आहे. याची शहानिशा करावी असेही नागरिकांनी ठेकेदाराला सांगितले. (प्रतिनिधी)
अखेर चूक मान्य...
पायऱ्या विषयी वाद सुरू असताना नागरिकांनी ‘लोकमत’ कार्यालयात फोन केला. कालव्याचे फोटो काढताच ठेकेदार आणि मुकादमाने आपली चूक मान्य केली, आणि येथे पायऱ्या करून देतो असे आश्वासन देऊ लागले.
पायऱ्यासाठी
अर्ज द्या
मुकादमाने लावलेल्या फोनवर अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही पायऱ्या बांधू पण तुम्ही आम्हाला अर्ज द्या. यावर नागरिकांनी अर्ज कशासाठी असा प्रश्न केला. पूर्वीपासूनच येथे पायऱ्या आहेत. त्यामुळे अर्ज देण्याचा संबंधच नाही. पूर्वीप्रमाणेच या ठिकाणी दोन्ही बाजूने पायऱ्या ठेवाव्यात असे नागरिकांनी ठणकाविले.