उरमोडीच्या कॅनॉलचे पाणी पारगाव तलावाकडे सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 11:04 PM2017-08-27T23:04:32+5:302017-08-27T23:04:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसेसावळी : पुसेसावळी व परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आणि प्रशासनास पत्रव्यवहार करूनही पाणी मिळेना, असे वास्तव निर्माण झाल्यानंतर ‘मनसे’चे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखाली वडी येथे उरमोडीच्या पाटातून जाणारे पाणी दारे उचलून पारगाव तलावाकडे सोडण्यात आले. यावेळी पुसेसावळी, कळंबी, वडी, राजाचे कुर्ले येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खटाव तालुक्यातील पुसेसावळी व परिसरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. असे असताना येथून जवळून जाणारे पाणी पाहाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. ‘पाणी उशाला व कोरड घशाला’ अशी स्थिती होती. या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनानेही लक्ष दिले
नाही.
संबंधितांकडून जिल्हा प्रशासनाकडे टंचाईबाबत पत्रव्यवहार न झाल्याने जिल्हाधिकाºयांनीही पाणी सोडण्याचे आदेश दिले नाहीत. गटविकास अधिकारी, तहसीलदार यांना पत्रव्यवहार झाले. मात्र, प्रांतांनी कोणतेच पाऊल उचलले नाही. परिणामी प्रशासनाची वाट पाहून लोकांनी स्वत:च पाणी मिळविण्यासाठी दारे उचलून पाण्याचा मार्ग मोकळा केला. त्याला ‘मनसे’चे संदीप मोझर यांनी साथ दिली. रविवारी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान ग्रामस्थांनी एकत्र येऊन हे पाऊल उचलले. वडी येथे
कॅनॉलचे दार उचलून पाणी पारगावच्या तलावाकडे सोडण्यात आले.