साताऱ्यात आघाडीचा उमेदवार ठरेना; माढ्यावर अजित पवार गटाचाही दावा...
By नितीन काळेल | Updated: March 6, 2024 22:04 IST2024-03-06T22:03:20+5:302024-03-06T22:04:02+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी बैठकांना जोर; जागा वाटपाचा पेच

साताऱ्यात आघाडीचा उमेदवार ठरेना; माढ्यावर अजित पवार गटाचाही दावा...
सातारा: लाेकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या बैठकावर बैठका होत असून अजूनही अनेक मतदारसंघाबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे जागा वाटपाचा पेच कायम आहे. अशातच सातारा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीच लढणार असलीतरी शरद पवार गटाचा उमेदवार ठरलेला नाही. तर दुसरीकडे महायुतीतून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने पुन्हा सातारा, माढ्यावर दावा केल्याने राजकीय तिढा वाढला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि माढा हे लोकसभेचे दोन्ही मतदारसंघ नेहमीच चर्चेत येतात. यावेळीही पेच निर्माण झालेला आहे. याला कारण म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील फाटाफूट. या पार्श्वभूमीवरच आताची निवडणूक होत आहे. सातारा मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीत एकवाक्यता आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला जाणार आहे. पण, या गटाचा उमेदवार ठरता ठरेना. त्यातच बुधवारी विशेष हेलिकाॅप्टरने खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सत्यजितसिंह पाटणकर मुंबईला गेले. तेथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर बैठक झाली. पण, चाचपणी आणि चर्चे व्यतीरिक्त काहीच झाले नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शरद पवार गटाचा उमेदवार कधी ठरणार हे स्पष्ट नाही. मात्र, साताऱ्यात महाविकास आघाडीची बैठक झाली. त्याला ३८ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यातून आघाडीने एकसंधपणा राखत वज्रमूठ तरी आवळल्याचे स्पष्ट झाले आहे.
महायुतीत राष्ट्रवादीचा अजित पवार गट सामील आहे. या गटाची सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघाबाबत मुंबईत बैठक झाली. यावेळी पदाधिकारी व नेत्यांनी दोन्ही मतदारसंघ लढविण्यासाठी आग्रही भूमिका घेतली. यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जागा वाटपाचा निर्णय काही दिवसांत होईल. तोपर्यंत निवडणुकीच्या तयारीला लागा, असे फर्मानच सोडले आहे. त्यामुळे अजित पवार गटाची भूमिका कायम राहिली तर भाजपसाठी कठीण परीक्षा असणार आहे. कारण, साताऱ्यातून खासदार उदयनराजे भोसले हे आणि माढ्यातून रणजितसिंह नाईक-निंबाळकर पुन्हा तयारीत आहेत. अजित पवार गटाच्या भूमिकेवरच त्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे महायुतीत तरी सातारा आणि माढ्याचा पेच वाढत असल्याचे समोर येत आहे.
साताऱ्याची लढत उमेदवार कोण यावर ठरणार ?
सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीकडून अजुनही कोणताही उमेदवार स्पष्ट नाही. खासदार श्रीनिवास पाटील हेच सध्यातरी प्रबळ ठरु शकतात. पण, त्यांचे वयोमान पाहता पक्षाला दुसरा उमेदवार शोधावा लागेल. पण, तो ताकदीचा असावा लागणार आहे. तरच निवडणुकीत टीकाव धरता येईल. तर सातारा युतीत अजित पवार गटाकडे गेल्यास त्यांच्यापुढे अनेक पर्याय असलेतरी शरद पवार गटाचा उमेदवार कोण यावरच दादा गटाच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्याचबरोबर युतीतील शिवसेनेच्या शिंदे गटाने साताऱ्यावर दावा केला होता. पण, सध्यातरी या गटाकडून काहीच हालचाल नाही.