हाय व्होल्ट प्रचारात उमेदवार ‘कॅज्युअल’च!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 10:45 PM2019-04-08T22:45:29+5:302019-04-08T22:45:35+5:30

प्रगती जाधव-पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापू लागले आहे. आधी उन्हाळा आणि त्यात ...

Candidates in 'High Volt' campaign 'Casual'! | हाय व्होल्ट प्रचारात उमेदवार ‘कॅज्युअल’च!

हाय व्होल्ट प्रचारात उमेदवार ‘कॅज्युअल’च!

Next

प्रगती जाधव-पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापू लागले आहे. आधी उन्हाळा आणि त्यात राजकीय तापातापीमुळे निवडणुकीचा प्रचार हाय व्होल्ट होत आहे. या धामधुमीत दोन प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार अजूनही ‘कॅज्युअल’ लूकमध्येच मतदारांना सामोरे जात आहेत, हे विशेष
राजकीय व्यक्ती म्हटलं की पांढरा शुभ्र झब्बा कुर्ता असा पोषाख साधारणपणे आपल्या नजरेसमोर येतो. वयाने तरुण असलेले नेतेही राजकीय वातावरण तापू लागले की परंपरागत पोशाखात मतदारांना सामोरे जातात. झब्बा कुर्ता म्हणजे राजकीय नेत्यांची ओळख, असं जणू समीकरणच बनलं आहे. अलीकडे यात मोदी जॅकेटची भर पडली आहे. पायात कर्रकर्र वाजणारी कोल्हापुरी चप्पल व्यक्तिमत्त्व अधिक खुलवते.
सातारा लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सध्या प्रचाराची धामधूम दिसत आहे. विद्यमान खासदार उदयनराजे भोसले आणि नरेंद्र पाटील यांच्यात लढत होणार आहे. तरीही शैलेंद्र वीर, अभिजित बिचुकले अशा काही मंडळींनी आपली उमेदवारी या मतदार संघात जाहीर केली आहे. या सर्व उमेदवारांनी आपापल्या परीने प्रचाराची जोरदार तयारी केली आहे. भल्या सकाळी प्रचारासाठी बाहेर पडणाऱ्या या उमेदवारांना दिवसभर उन्हाचा तडाखाही चांगलाच बसत आहे.
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रचारांमध्ये कॉटन पांढरा शर्ट आणि निळी जिन्स आणि चप्पल घालण्याला प्राधान्य दिलं आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी नरेंद्र पाटीलही पूर्ण भायांचा पांढरा शर्ट आणि फॉर्मल पँट या पोषाखात दिसत आहेत. कवी मनाचे नेते अभिजित बिचुकलेही पूर्ण भायांचे टीशर्ट, जिन्स आणि डोळ्यावर गॉगल लावून मतदारांना सामोरे जात आहेत.
सातारा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केलेल्या या सर्वांनी सामान्यांना आपलसं करण्यासाठीच हा लूक स्वीकारला असल्याचं मतदारांचं म्हणणं आहे.
राजेंची कॉलर अन्
पाटलांची मिशी...!
प्रचाराच्या निमित्ताने विविध ठिकाणी जाणाऱ्या दोन्ही उमेदवारांनी स्वत:चे वेगळेपण जपले आहे. जाहीर सभा आणि विद्यार्थी संवाद कार्यक्रमात उदयनराजेंची कॉलर उडविण्याची स्टाईल तरुणाईमध्ये सुपर डुपर हिट आहे. भाषणाची सांगता ही कॉलर उडवून व्हावी, यासाठी तरुणाई आग्रही असते. तर नरेंद्र पाटील यांच्या मिश्यांच्या स्टाईलचे युवांसह मध्यवयीन मतदारांना अप्रूप असल्याचे पाहायला मिळते.

Web Title: Candidates in 'High Volt' campaign 'Casual'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.