पवित्र पोर्टलच्या उमेदवारांना फटका;‘लॉगीन’च होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:21 AM2018-12-31T00:21:12+5:302018-12-31T00:21:24+5:30
अजय जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क उंब्रज : शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीप्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, अनेक ...
अजय जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उंब्रज : शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीप्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, अनेक उमेदवारांना या प्रक्रियेतील तांत्रिक चुकांचा फटका बसला आहे. शासनाने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणनुसार एसईबीसी प्रवर्ग बदलण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पवित्र पोर्टलवर लॉगीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, अनेक उमेदवारांचे पवित्र पोर्टलवर लॉगीन होत नाही. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान, संबंधित उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्कच होत नाही. त्यामुळे संबंधित उमेदवार हतबल झाले आहेत. संबंधितांनी या तांत्रिक चुका सुधारून उमेदवारांचे भरतीबाबतचे नुकसान टाळावे, अशी मागणी संबंधित उमेदवारांनी केली आहे.
पवित्र पोर्टलमधील तांत्रिक चुकांचा फटका बसलेल्या उमेदवारांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी तसेच पवित्र पोर्टलची तांत्रिक व्यवस्था पाहणाऱ्या पुणे येथील एनआयसी संस्थेशी संपर्क केला. मात्र, त्यांच्याकडून तुम्ही याअगोदर पवित्र प्रणालीद्वारा केलेला अर्ज स्वप्रमाणित केला नाही. त्यामुळे ‘लॉगीन होत नाही,’ असे सांगण्यात आले. परंतु उमेदवारांचे म्हणणे असे आहे की, दिलेल्या वेळेत आम्ही सर्व सूचनांचे पालन केले आहे.
अर्ज देखील स्वप्रमाणित केला आहे. याउलट मागील कित्येक महिन्यापासून भरतीप्रक्रिया सुरू असूनही उमेदवारांना त्यांच्या संपर्क क्रमांकावर कोणत्याच मेसेजद्वारे माहिती देण्यात येत नाही. भरतीप्रक्रिया बरेच दिवस झाले सुरू असून, उमेदवारांना प्रत्येक प्रक्रियेच्या टप्प्यामध्ये संपर्क क्रमांक अथवा ई-मेलवर याबाबतची माहिती मेसेजद्वारा देणे अपेक्षित आहे. मात्र, असा कोणताच मेसेज, ईमेल उमेदवारांना करण्यात आलेला नाही. मागील काही महिन्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज स्वप्रमाणित केले होते. मात्र, ते स्वप्रमाणित झाले की नाही, हे उमेदवारांना समजलेच नाही.
याबाबत काही उमेदवारांना स्क्रीनवर अर्ज स्वप्रमाणित झाल्याचे मेसेज दिसले. तर काहींना त्यावेळी प्रिंट निघाली नाही. तर काहींना निघालेली प्रिंट स्वप्रमाणित असा मेसेज स्क्रीनवर दिसूनही प्रिंट मिळाली. ड्राफ्ट प्रिंट आणि स्वप्रमाणित प्रिंटमध्ये काय फरक असतो, याची उमेदवारांना त्यावेळी काहीच कल्पना नव्हती. तसेच अर्ज जर स्वप्रमाणित करण्यासाठी जर प्रक्रिया राबविण्यात येत होती तर फक्त स्वप्रमाणित प्रिंट हाच पर्याय पोर्टलवर असणे अपेक्षित होते. जेणेकरून उमेदवारांना त्याचवेळी खात्री झाली असती. अर्ज स्वप्रमाणित झाला, असा मेसेज उमेदवारांच्या संपर्क क्रमांकावर अथवा ई-मेलवर का देण्यात आला नाही? तसेच असा स्टेटस सिस्टिमद्वारा पोर्टलवर का दाखविण्यात येत नाही, अशी विचारणा उमेदवार करत आहेत.
पवित्र प्रणालीच्या या तांत्रिक गैरकारभारामुळे गुणवत्ता असूनही उमेदवारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत शिक्षण विभाग उदासीन असून कोणतीच सुधारणा करताना दिसत नाही. एखाद्या परीक्षेत यश मिळविण्यासाठी उमेदवार रात्रन्दिवस कष्ट करून परीक्षेत उत्तीर्ण होतात. मात्र अशा तांत्रिक चुकांमुळे शिक्षक भरतीच्या प्रक्रियेपासून वंचित राहावे लागत आहे.