ऊस वाहतूक वाहनांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:41 AM2021-01-13T05:41:45+5:302021-01-13T05:41:45+5:30
सातारा : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असून वाहनांतून ऊस वाहतूक करण्यात येत आहे. मात्र, ग्रामीण भागात काही ...
सातारा : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असून वाहनांतून ऊस वाहतूक करण्यात येत आहे. मात्र, ग्रामीण भागात काही ठिकाणी वीजवाहक तारा लोंबकळत असल्याने धोका वाढला आहे. ग्रामीण भागातून वाहतूक करून ऊस कारखान्यात नेण्यात येतो. मात्र, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजतारा खाली आल्या आहेत. यापासून धोका निर्माण झाला आहे. तसेच चालकाला कसरत करत जावे लागत आहे.
..............................................
गावोगावच्या यात्रांवर
कोरोनाचे सावट
सातारा : जिल्ह्यात सध्या यात्रांना सुरुवात झाली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा साधेपणाने साजऱ्या होत आहेत. दिवाळीनंतर जिल्ह्यातील यात्रांना सुरुवात होते. सध्या अनेक गावांच्या यात्रा झाल्या. पण, ग्रामस्थांनी कोरोनामुळे यात्रा घरगुती व साध्या पद्धतीने साजऱ्या केल्या. यात्रांना नातेवाइकांनाही निमंत्रण देण्यात येत नाही.
..................
ढगाळ वातावरणामुळे चिंता
वरकुटे मलवडी : माण तालुक्यात काही वेळा ढगाळ वातावरण तयार होत आहे. यामुळे पिकांवर चिकटा रोग पडण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. ढगाळ वातावरण कायम राहिल्यास ज्वारीवर चिकटा रोग पडण्याची चिंता आहे. कारण, सध्या ज्वारी, गहू पिके चांगल्या स्थितीत आलेली आहेत. तसेच पिकांना पाणीही देण्यात येऊ लागले आहे.
.............................................
खटाव तालुक्यात
पिके चांगली...
मायणी : खटाव तालुक्यात रब्बी हंगामातील पिके चांगली आली आहेत. भांगलणी झालेल्या पिकांना शेतकरी पाणी देताना दिसून येत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात ज्वारी, गव्हासह मका अशी पिके घेतली आहेत. तर मोठ्या झालेल्या पिकांना शेतकरी पाणी देत आहेत. या वर्षी पाऊस चांगला झाला आहे.
.....................................
माणमधील बंधाऱ्यात
पाणीसाठा टिकून
कुकुडवाड : माण तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे सद्य:स्थितीत गावोगावच्या बंधाऱ्यांत चांगलाच पाणीसाठा टिकून आहे. तालुक्यात गेल्या वर्षी दमदार पाऊस झाला होता. यामुळे गावोगावच्या ओढ्यांना अजूनही काही प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे बंधाऱ्यात पाणीसाठा टिकून आहे.
......................................