जगाचे नेतृत्व करण्याची महिलांमध्ये क्षमता : थोरात

By admin | Published: February 5, 2017 12:51 AM2017-02-05T00:51:42+5:302017-02-05T00:51:42+5:30

ताराराणी विद्यापीठातर्फे सन्मान : उषा थोरात यांना भद्रकाली ताराराणी पुरस्कार प्रदान

Capacity in women to lead the world: Thorat | जगाचे नेतृत्व करण्याची महिलांमध्ये क्षमता : थोरात

जगाचे नेतृत्व करण्याची महिलांमध्ये क्षमता : थोरात

Next

कोल्हापूर : सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या असंख्य महिलांनी समाजाशी संघर्ष करून शिक्षणाचा हक्क आणि समानतेचा अधिकार मिळविला आहे. महिलांमध्ये असलेल्या क्षमतांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास करून त्या जगाचे नेतृत्व करू शकतात, असा विश्वास रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांनी व्यक्त केला.
येथील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनमध्ये शनिवारी ताराराणी विद्यापीठातर्फे आयोजित कार्यक्रमात त्यांना ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या हस्ते ‘भद्रकाली ताराराणी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर ‘नाबार्ड’चे माजी चेअरमन डॉ. यशवंत थोरात, डॉ. एस. एन. पवार, प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील, प्राजक्त पाटील, डी. आर. मोरे उपस्थित होते. रोख रक्कम रुपये ५१ हजार, सन्मानचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
उषा थोरात म्हणाल्या, महिलांना आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करावा लागला आहे. त्यांच्यामध्ये असणाऱ्या मातृत्व, संवेदनशीलता, संयम आणि शांतता, प्रामाणिकपणा या गुणांमुळे त्या सर्वांना सोबत घेऊन विकास साधतात. मला मिळालेला हा पुरस्कार तळागाळात राहून संघर्ष करणाऱ्या महिलांना समर्पित आहे.
प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, सत्याचं तोंड सुवर्णाच्या थाळीने बंद झालेले आहे, हे वचन खोडून काढण्याचे काम उषा थोरात यांनी केले आहे. भांडवलशाहीच्या मुजोरीने राज्यकर्त्यांचे तोंड नोटांनी बंद केले आहे. अशा परिस्थितीत बँकिंग हे क्षेत्र अतिशय संवेदनशील बनले आहे. या क्षेत्रात उच्चपदस्थ राहून थोरात यांनी तत्त्वांशी तडजोड न करता कर्तृत्व सिद्ध केले आहे. यशवंत थोरात यांनी, उषा थोरात या एक बँक अधिकारी म्हणून कर्तृत्ववान आहेतच; पण एक पत्नी, मुलगी, सून, आई अशा नात्यांचे अनेक पदर सांभाळत त्यांनी कुटुंब व्यवस्थेलाही न्याय दिला असल्याचे मनोगत व्यक्त केले. डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. एस. डी. चव्हाण यांनी गौरवपत्राचे वाचन केले. अंजली साठे व पौर्णिमा मंडलिक यांनी सूत्रसंचालन केले. अंजली साठे यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. जे. एफ. पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)


उषा थोरात यांच्या यशस्वीतेच्या गुरुकिल्ल्या
शिक्षण फक्त मार्कांसाठी घेऊ नका, संवाद वाढवा.
शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेला प्रोत्साहन द्या.
शक्य तेवढे जास्त वाचन करा, अभ्यास करा.
स्वतंत्र विचारशक्तीने निर्णय घ्या आणि त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा.
चांगल्या गोष्टींची पाठ सोडू
ाका.
तत्त्वांशी तडजोड करू नका. पारदर्शकपणे कारभार सांभाळा.
मेहनतीला पर्याय नाही. त्यावरच तुमचे यश अवलंबून आहे.

Web Title: Capacity in women to lead the world: Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.