कोरोना विरुद्धची मॅच जिंकण्यासाठी कॅप्टन ऑन फील्ड...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:27 AM2021-06-03T04:27:32+5:302021-06-03T04:27:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने आता जोरदार मोहीम हाती घेतलेली पाहायला मिळते. ...

Captain on the field to win the match against Corona ...! | कोरोना विरुद्धची मॅच जिंकण्यासाठी कॅप्टन ऑन फील्ड...!

कोरोना विरुद्धची मॅच जिंकण्यासाठी कॅप्टन ऑन फील्ड...!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने आता जोरदार मोहीम हाती घेतलेली पाहायला मिळते. दुसऱ्या लाटेत थोडे दुर्लक्ष झाले आता दुर्लक्ष करून चालणार नाही, हे लक्षात घेऊन प्रशासन कामाला लागले आहे. दस्तुरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी फलटण, माण तालुक्यातील विविध गावांचे दौरे करून बुधवारी प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना केल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटी म्हणजे ‘कॅप्टन ऑन फिल्ड’, अशी चर्चा रंगली आहे.

गृह विलगीकरणामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे गृह विलगीकरण बंद करण्यात आले असून कोरोना रुग्णांसाठी गावपातळीवर विलगीकरण कक्ष करण्यात यावे तसेच ग्रामदक्षता समितीने गावातील रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात आणावे, अशा सूचना आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी फलटण व माण तालुक्यातील गावांना भेटी देऊन सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सूचना केल्या. तरडगाव येथील भेटीदरम्यान आमदार दीपक चव्हाण उपस्थित होते. या भेटी दौऱ्यात फलटणचे प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. माण तालुक्यातील ही गावांमध्ये जाऊन विलगीकरण कक्षांची पाहणी त्यांनी केली. माण तालुक्यातील या पहाणी प्रसंगी प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार बाई माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

गृह विलगीकरणामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे जास्तीत जास्त रुग्ण संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल करावे. यासाठी प्रत्येक गावातील ग्रामदक्षता समितीने पुढाकार घ्यावा. विलगीकरण कक्षातील रुग्णांच्या तपासणीसाठी उपकेंद्रातील डॉक्टर, नर्स, आशा सेविका तसेच खासगी डॉक्टरांचा सहभाग घेण्यात यावा, असे सांगून जिल्हाधिकारी शेखर सिंह पुढे म्हणाले, आशा यांनी कोमॅार्बिड सर्वेक्षण काम नियमितपणे करावे त्यांची माहिती संबंधितांना तत्काळ द्यावी. गावपातळीवरील काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गावावर लक्ष केंद्रित करून कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी भेटीप्रसंगी दिल्या.

फलटण तालुक्यातील हिंगणगाव, तरडगाव, गोखळी तांबवे, पाडेगाव, ढवळ, वाखरी, तिरकवाडी तसेच माण तालुक्यातील म्हसवड, मार्डी, वावरहिरे, बिदाल या गावांमध्ये सुरु करण्यात आलेल्या संस्थात्मक विलगीकरण कक्षांची पहाणी करुन तेथील व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले.

केवळ कागदोपत्री काम नको..

आशा सेविका यांना दररोज फक्त १०-१५ कोमॅार्बिड व्यक्तींची माहिती घ्यायची आहे, त्यामुळे फोनवर माहिती न घेता प्रत्यक्ष जाऊन माहिती घ्यावी. एखादा व्यक्ती जागेवर न आढळल्यास चुकीची माहिती भरू नये. गावामध्ये तलाठी, ग्रामसेवक यांनी पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. टेस्टिंग व विलगीकरणासाठी आवश्यकता भासल्यास पोलिसांची मदत घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

विलगीकरण कक्षात योगा, मनोरंजनाची साधने

विलगीकरण कक्षातील रुग्णांच्या तपासणीसाठी उपकेंद्रातील डॉक्टर, नर्स, आशा सेविका तसेच खासगी डॅाक्टरांचा सहभाग घेण्यात यावा. रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये सर्व सुविधा पुरवल्या तर रुग्ण तेथे येण्यास विरोध करणार नाहीत. विलगीकरणातील रुग्णांसाठी योगा, याबरोबरच इतर मनोरंजन साधणे आवश्यकतेनुसार पुरवावीत.

फोटो आहेत...

Web Title: Captain on the field to win the match against Corona ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.