टायर फुटल्याने कार कालव्यात
By Admin | Published: June 3, 2015 10:49 PM2015-06-03T22:49:16+5:302015-06-04T00:01:12+5:30
कार्वे चौकीतील दुर्घटना : चार गंभीर; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
कार्वे : तासगावहून कऱ्हाडकडे येणाऱ्या कारचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून कार कालव्यात कोसळली. कऱ्हाड-तासगाव मार्गावर कार्वेचौकी, ता. कऱ्हाड येथे बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
सुधीर पांडूरंग पाटील, धोंडीराम रघुनाथ पाटील (रा. वसगडे, ता. तासगाव) यांच्यासह अन्य दोघांचा जखमींमध्ये समावेश आहे. अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वसगडे येथील सुधीर पाटील यांच्यासह चारजण बुधवारी पहाटे कारमधून (क्र. टीएन ०४ एएफ ३६६९) पुण्याला निघाले होते. तासगाव मार्गावरून ते कऱ्हाडला येत असताना कार्वेचौकी येथे असलेल्या धोकादायक वळणावर अचानक कारचा टायर फुटला. त्यामुळे चालक सुधीर पाटील यांचा ताबा सुटून कार कालव्याच्या पाण्यात कोसळली. अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली.त्यांनी जखमींना कारमधून बाहेर काढले. उपचारार्थ त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, कार्वेचौकी येथे कालव्यावर असणारा पुल सध्या धोकादायक बनला आहे. या पुलाचे संरक्षक कठडे यापुर्वीच तुटले आहेत. त्यामुळे धोकादायक वळण व पुलाला संरक्षक कठडेच नसल्याने येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपुर्वीच एका दुचाकीस्वाराचा येथे गंभीर अपाघात झाला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. (प्रतिनिधी)
वर्षभरात ३६ अपघात
वर्षभरात येथे सुमारे ३६ अपघात झाले आहेत. पुलाला संरक्षक कठडे उभारण्याची मागणी वारंवार केली जाते. मात्र, त्याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे कार्वेचे सरपंच वैभव थोरात व संभाजी ब्रिगेडचे राज्याध्यक्ष संतोष पाटील यांनी सांगीतले.