महाबळेश्वरनजीक आठ फूट खड्ड्यात कार कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:24 AM2021-07-19T04:24:55+5:302021-07-19T04:24:55+5:30
महाबळेश्वर : वेण्णा लेकजवळ प्रतापसिंह उद्यानाजवळ कार सात ते आठ फूट खोल खड्ड्यात कोसळून पुणे येथील दोघे जखमी झाले. ...
महाबळेश्वर : वेण्णा लेकजवळ प्रतापसिंह उद्यानाजवळ कार सात ते आठ फूट खोल खड्ड्यात कोसळून पुणे येथील दोघे जखमी झाले. स्थानिक युवकांनी कारमधील दोघांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. हा अपघात शनिवारी मध्यरात्री झाला.
या अपघातात डाॅ. रिमा मनोहर बौधे (वय ३२, रा. पुणे) यांच्यासह अन्य एकजण जखमी झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, महाबळेश्वर येथून शनिवारी रात्री १ वाजता नोबीन खान व मुस्तकीन बागवान हे दोघे वाईकडे निघाले होते, त्यांची गाडी महाबळेश्वरपासून १ किलोमीटर अंतरावर प्रतापसिंह उद्यानाजवळ येताच त्यांना एका महिलेचा ‘वाचवा वाचवा’ असा आवाज आल्याने ते थांबले. गाडीतून खाली उतरून ते आवाजाच्या दिशेने गेले, त्यावेळी ते दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. कार (एमएच १२ जेसी २६०५) ही सात ते आठ फूट खोल खड्ड्यात कोसळली होती. त्या कारमधील महिला जखमी झाली होती. या युवकांनी कारमधील जखमी दोघांना बाहेर काढले व तातडीने त्यांना रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
जखमी महिला ही पुणे येथील भूलतज्ज्ञ डाॅक्टर आहे. ते आपल्या मित्राबरोबर महाबळेश्वरला सहलीसाठी आले होते. साडेबाराच्या सुमारास त्यांची कार प्रतापसिंह उद्यानाजवळ आली. यावेळी हलका पाऊस पडत होता तर रस्त्यावर प्रचंड धुके पसरले होते. रस्त्यावर पथदिवेही बंद होते तर रस्त्याकडेला ना पांढरे पट्टे होते ना दिशादर्शक होते. त्यामुळे चालकाचा अंदाज चुकला व त्यांची कार रस्त्याकडेच्या दगडावरून आठ फूट खोल खड्ड्यात कोसळली. या अपघाताची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात झाली नव्हती.