Satara News: खंबाटकी नजीक कॅनॉलमध्ये कार कोसळली, पोलिस-ग्रामस्थांमुळे जीवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 07:53 PM2023-08-12T19:53:12+5:302023-08-12T19:54:07+5:30
खंडाळा पोलिसांची तत्परता..
मुराद पटेल
शिरवळ : आशियाई महामार्गावरील खंडाळा गावच्या हद्दीतील खंबाटकी घाटात असणाऱ्या धोम-बलकवडीच्या कँनाँलमध्ये लघुशंकेसाठी थांबलेल्या दोघांपैकी एकाला कारने धडक देत कार कँनाँलमध्ये कोसळली. खंडाळा पोलिस व नागरिकांच्या तत्परतेने कारमधील लहान मुलासह पाच जणांना व अपघातग्रस्त गंभीर जखमी युवकाचा जीव वाचविण्यात यश आले.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, पुण्याहून डफळपूर ता.जत या ठिकाणी निघालेले राहुल भाग्यवंत उबाळे (वय २५) व अविनाश भाग्यवंत उबाळे (२९) हे दोघे भाऊ लघुशंकेसाठी कॅनॉल लगत थांबले होते. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेली कार (क्र.एमएच-१२- टिवाय-१०६६) ने राहुल व अविनाशला धडक दिली. यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार धोम-बलकवडी कॅनॉलमध्ये कोसळली.
धडकेत राहुल गंभीर तर अविनाश किरकोळ जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी खंडाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजू अहिरराव, प्रविण मंहागडे, पोलिस अंमलदार विजय पिसाळ, दत्तात्रय धायगुडे, अतुल आवळे, संजय पंडित, सचिन शेलार, उद्धव शिंदे व कर्मचारी, महामार्ग पेट्रोलिंग पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने कारमधील चालक श्रीपती श्रीमंत शिंदे (४२), श्रीमंत शिंदे (७०), राजश्री श्रीपती शिंदे (३७), संकेत श्रीपती शिंदे (१३), संस्कृती श्रीपती शिंदे (८ सर्व रा.अथनी, ता.बेळगाव,सध्या रा.पुणे) या पाच जणांना कारमधून बाहेर काढले.
दरम्यान,गंभीर जखमी झालेल्या राहुल उबाळे याला अधिक उपचाराकरीता पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद खंडाळा पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू अहिरराव हे करीत आहेत.
खंडाळा पोलिसांची तत्परता..
कार कँनाँलमध्ये कोसळल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ कारमधील प्रवाशांना व गंभीर जखमी युवकाला आपल्या जीपमधून रुग्णालयात दाखल केल्याने संबंधितांचा जीव वाचविण्यात यश आले. तर पाण्याच्या प्रवाहात वाहून तब्बल एक किलोमीटर वाहून गेलेली कार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढली.