भरधाव कारने चार दुचाकींना उडवले

By admin | Published: January 22, 2017 11:36 PM2017-01-22T23:36:13+5:302017-01-22T23:36:13+5:30

टाळगावला थरारनाट्य : एक ठार, सात गंभीर; ‘हिट अ‍ॅण्ड रन’नंतर पळून जाताना दुर्घटना

The car was flying by four bikes | भरधाव कारने चार दुचाकींना उडवले

भरधाव कारने चार दुचाकींना उडवले

Next



उंडाळे : दोन वाहनांना ठोकर बसल्यानंतर पलायनाच्या प्रयत्नात असलेल्या चालकाचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे कारची अन्य तीन दुचाकींना धडक बसून एकजण ठार तर सातजण गंभीर जखमी झाले. कऱ्हाड-चांदोली मार्गावर टाळगाव, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हे थरारनाट्य घडले.
सूर्यकांत जगन्नाथ साठे (वय ५४, रा. टाळगाव) असे ठार झालेल्याचे नाव आहे. तर चंद्रकांत रघुनाथ पवार ( ४२, रा. धोंडेवाडी), स्वप्नील माने (२२), अनिकेत गौतम माने (१८, दोघेही रा. घोगाव), जगन्नाथ वसंतराव पाटील (४४), ओंकार श्रीकृष्ण जाधव (१७), अमोल पतंगराव जाधव (२१), देवराज सचिन आडके (१२, सर्व रा. टाळगाव) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
घटनास्थळावरील माहितीनुसार, पुणे येथील एक कुटुंब कारने (एमएच १४ एवाय ०६९४) फिरण्यासाठी चिपळूणकडे गेले होते. रविवारी दुपारी हे कुटुंब कारने पुन्हा पुण्याला जाण्यासाठी निघाले. कऱ्हाड-चांदोली मार्गावर घोगाव गावच्या हद्दीत आल्यानंतर कारची एका वाहनाला ठोकर बसली. मात्र, चालकाने भीतीपोटी कार न थांबवता तशीच पुढे नेली. तेथून काही अंतरावर आणखी एका वाहनाला कारची ठोकर बसली. त्यामुळे चालक आणखीनच घाबरला. त्याने कार सुसाट पळविण्यास सुरुवात केली. घोगावपासून दोन किलोमीटर पुढे गेल्यानंतर चालकाचा कारवरील ताबा सुटला. कारची एका दुचाकीला धडक बसली. त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा चार दुचाकी (एमएच ११ एई ५०७१, एमएच ११ एजी ९९५४, एमएच ११ व्ही ३३२३, एमएच १२ एफई २६९) कारने उडवल्या.
ग्रामस्थ वाट मिळेल, त्या दिशेने धावले. अखेर रस्त्यानजीकच्या चिकन शॉपला धडक देत फलकावर जाऊन आदळल्यानंतर कार थांबली. त्यामुळे ग्रामस्थांनी रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेल्या जखमींकडे धाव घेऊन त्यांना उपचारार्थ उंडाळेच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, काहींची प्रकृती गंभीर असल्याने सर्वांनाच पुढील उपचारासाठी कऱ्हाडच्या खासगी रुग्णालयात हलवले.
कार थांबल्यानंतर त्यामधील सर्वजण खाली उतरले. कारमध्ये दोन दाम्पत्य व त्यांची तीन मुले अशी सातजण होती. या अपघातामुळे कारमधील सर्वजण घाबरले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उंडाळे पोलिस दूरक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी कारमधील सर्वांना सुरक्षेसाठी दूरक्षेत्रात नेले.
अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात सुरू होते. (वार्ताहर)

Web Title: The car was flying by four bikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.