चाळकेवाडीत कारची काच फोडून चोरी; २४ तासांत चोरट्याला अटक
By नितीन काळेल | Published: December 22, 2023 07:39 PM2023-12-22T19:39:27+5:302023-12-22T19:40:12+5:30
सातारा तालुका पोलिसांची कामगिरी : प्री वेडिंगसाठी गेल्यावर प्रकार
नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : चाळकेवाडी, ता. सातारा येथे प्री वेडिंग फोटो शूटसाठी गेल्यावर उभ्या केलेल्या कारची काच फोडून दोन बॅगांसह कॅमेरे, फोटो शुटचे साहित्य चोरुन नेण्यात आले होते. याप्रकरणी तालुका पोलिसांनी अवघ्या २४ तासांत चोरट्याला जेरबंद केले. त्याच्याकडून दोन लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुमीत प्रवीणकुमार चव्हाण आणि अभिजीत पोपट वारागडे (रा. शाहूपुरी, सातारा) हे प्री वेडींग फोटो शूटसाठी चाळकेवाडी येथे गेले होते. त्यावेळी रस्त्याच्या बाजुला त्यांनी कार उभी केली होती. फोटो शुटसाठी गेल्यावर अज्ञाताने कारची डाव्या बाजुची मागील काच फोडून कॅमेरे, फोटो शूटचे साहित्य दोन बॅगासह लंपास केले. या चोरीनंतर सुमीत चव्हाण यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा नोंद केला.
सातारा तालुका ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने २४ तासांच्या आत चोरीचा छडा लावला. तसेच याप्रकरणी रामचंद्र तुकाराम पवार (रा. मायणी, ता. जावळी) याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याने चोरीची कबुली दिली. तसेच त्याच्याकडून कॅमेरा, चार्जर, बॅटरी, माईक, लेन्स तसेच कागदपत्रे असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास हवालदार वायदंडे हे करीत आहेत.
पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक फार्णे, उपनिरीक्षक डी. ए. दळवी, हवालदार राजू शिखरे, मालोजी चव्हाण, धनंजय कुंभार, तुकाराम पवार, महेंद्र नारनवर, डफळे आदींनी सहभाग घेतला.