काळजी घेतली; पण डोकेदुखी वाढली

By admin | Published: February 19, 2015 10:08 PM2015-02-19T22:08:45+5:302015-02-19T23:46:20+5:30

सबुरीचा सल्ला महागात पडणार !

Cared for; But increased headaches | काळजी घेतली; पण डोकेदुखी वाढली

काळजी घेतली; पण डोकेदुखी वाढली

Next

कऱ्हाड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक १७ मार्चला होत आहे. त्यासाठी तब्बल २२४ इच्छुकांनी २१ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत. नुकत्याच झालेल्या छाननीत दोन वगळता साऱ्यांचेच अर्ज उरले आहेत; पण त्यामुळे आता अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
सह्याद्री कारखान्याच्या इतिहासात प्रथमच इच्छुक उमेदवारांची मांदियाळी पाहायला मिळाली आहे. विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील गटासह काँग्रेसचे धैर्यशील कदम, स्वाभिमानीचे मनोज घोरपडे आणि माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर समर्थकांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्याने सध्यातरी निवडणुकीत वेगळाच रंग भरलेला दिसतो. गत दोन निवडणुका बिनविरोध झालेल्या कारखान्यात यंदाची निवडणूक चांगली होणार हे काही महिन्यांपासूनच स्पष्ट झाले होते.
सहकार कायद्यात झालेले बदल सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांनीही कसलेली कंबर, या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्जावरती परस्परविरोधकांच्या हरकती येणार, मातब्बरांचे पंख निवडणुकीपूर्वीच छाटण्याचा प्रयत्न होणार, त्यामुळे साऱ्याच नेत्यांनी काळजी घेत हातचा राखत जादा पर्यायी उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवले; पण छाननीची प्रक्रिया निर्विघ्न पार पडली. सारेच अर्ज ग्राह्य झाले. त्यामुळे ध्यानी-मनी नसणारेही इच्छुक आता गुडघ्याला बाशिंग बांधू लागले आहेत. अर्ज भरलाच आहे, आता उमेदवारीही मिळते का पाहू, या दृष्टिकोनातून त्यांनी आपापल्या नेत्यांकडे फिल्डिंग लावलीय म्हणे.
सत्ताधारी बाळासाहेब पाटील गटाकडून सर्वाधिक शंभरावर इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर धैर्यशील कदम इच्छुक समर्थकांनीही पन्नाशी गाठली आहे. स्वाभिमानीचे मनोज घोरपडे अन् माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर समर्थकांनीही भरपूर अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे यातील प्रत्यक्ष रिंगणात कोण-कोण असणार, याची साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. आमदार बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी निश्चित करताना खूपच कसरत करावी लागणार आहे. एकाला उमेदवारी देताना दुसरा इच्छुक नाराज होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. आणि त्याविरोधात जर ‘मनोधैर्य’ एकवटणार असेल तर त्या पॅनेलमध्येही आपली वर्णी लावण्यासाठी इच्छुक फिल्डिंग लावणार. त्यावेळीही नेत्यांचा कस लागणार आहे. (प्रतिनिधी)

सबुरीचा सल्ला महागात पडणार !
खरंतर निवडणुकीत छाननीदरम्यान काही अर्ज बाद झाले तर पर्यायी उमेदवार अर्ज असावा, यासाठी नेत्यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांना अर्ज भरून ठेवा; मग बघू, असा सल्ला दिला होता; पण ही काळजी आज त्यांची डोकेदुखी वाढविताना दिसत आहे. कारण अर्ज भरायला सांगितला. त्यामुळे आमचाही विचार करा, असा आग्रह आता अनेकजण धरू लागले आहेत.
उंडाळकर समर्थकांचे काय ?
माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या अनेक समर्थकांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती विठ्ठलराव जाधव, तांबवेचे माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णा पाटील, वसंतराव जगदाळे आदींचा समावेश आहे. हे समर्थक नेमकी काय भूमिका घेणार, याबाबतही सध्या तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

Web Title: Cared for; But increased headaches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.