काेराेना लसीकरण; सामान्यांना अजून थोडे थांबावेच लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:42 AM2021-01-16T04:42:04+5:302021-01-16T04:42:04+5:30
सातारा : कोरोना लसीकरण मोहीम कधी सुरू होणार, याची सर्वसामान्य लोक वाट पाहत आहेत. मात्र, त्यांना अजून काही दिवस ...
सातारा : कोरोना लसीकरण मोहीम कधी सुरू होणार, याची सर्वसामान्य लोक वाट पाहत आहेत. मात्र, त्यांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. सुरुवातीला तीन टप्प्यांमध्ये शासकीय कर्मचारी आहेत, त्यांनाच लस दिली जाणार आहे.
कोरोना लसीकरणाला शनिवार, दि.१६ पासून प्रारंभ होत आहे. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय, सातारा, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड, उपजिल्हा रुग्णालय फलटण, मिशन हॉस्पिटल, वाई, पाटण, कोरेगाव, दहिवडी, खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये लसीकरण केले जाणार असल्याने याठिकाणी तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे.
एकूण २४ हजार ४१० आरोग्य कर्मचाऱ्यांना हे लसीकरण केले जाणार आहे. शीतसाखळी केंद्रे, डीप फ्रीजरची व्यवस्था लस ठेवण्यासाठी केली असून, २८ दिवसांच्या अंतराने संबंधित कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जाणार आहे. ज्यांना लस दिले आहे, त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात येणार असून, केंद्रांवर १०८ रुग्णवाहिका असणार आहे.
कोणत्या बूथवर दिली जाणार लस
१) जिल्ह्यातील ९ केंद्रांवर सर्वांत प्रथम लसीकरण मोहीम सुरू केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ३० हजार लोकांना लसीकरण होईल.
२) शासनाच्या लसी प्राप्त झाल्यानंतर व्यापक प्रमाणात लसीकरण केले जाणार आहे. सामान्य लोकांपर्यंत ती पोहोचायला अजून वेळ
३) देशात कोरोना महामारीची व्याप्ती कमी झालेली आहे. एप्रिल महिन्यापर्यंत ती अटोक्यात येण्याची शक्यता आहे.
लसीकरण कोणाला व कधी?
शासनाला उपलब्ध केलेल्या ३० हजार लस या पहिल्या टप्प्यात आरोग्यावर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना दिली जाईल. त्यानंतर पोलीस व शेवटच्या टप्प्यात सामान्य लोकांना दिली जाईल. यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी लागणार आहे.
तीन टप्प्यांत होणार लसीकरण
पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय व खासगी आरोग्य संस्थांतर्गत कर्मचाऱ्यांना व पुढच्या टप्प्यात पोलीस विभाग आणि त्यानंतरच्या टप्प्यात सर्वसामान्य लोकांना कोरोना लसीकरण केले जाणार आहे.
कोरोना लसीकरण अत्यंत सुरक्षित आहे, तसेच ही लस ऐच्छिकदेखील आहे. लसीकरणानंतरदेखील योग्य सामाजिक अंतर ठेवणे, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे, तरच कोरोना दूर राहू शकतो.
-डॉ. सुभाष चव्हाण