स्वच्छता जागृतीसाठी कऱ्हाडात फलक अभियान
By Admin | Published: May 3, 2016 09:06 PM2016-05-03T21:06:50+5:302016-05-04T01:09:44+5:30
पालिकेचा पुढाकार : शहरात प्रत्येक प्रभागात घंटागाडीच्या वेळेचे फलक; कर्मचाऱ्यांनाही कचरा वर्गीकरणाचे प्रशिक्षण
संतोष गुरव -- कऱ्हाड -शहरात वाढत चाललेल्या कचऱ्याच्या समस्येवर उपाय काढण्यासाठी नुकतेच स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ राबविण्याचा निर्णय राज्यशासनाकडून घेण्यात आला. राज्यातील महानगरपालिका व पालिकांनाही शहरात स्वच्छ शहर अभियान राबविण्यात यावे, अशा सूचना केल्या. या अभियानाच्या पातळीवर कऱ्हाड येथे पर्यावरण जनजागरण अभियान सुरू करण्यात आले आहे. पालिकेकडून शहरात फलकांद्वारे स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचे काम केले जात आहे.शहरातील कचरा निर्मूलनासाठी कऱ्हाड जिमखाना व पालिकेच्या वतीने पर्यावरण जनजागरण अभियान २२ जानेवारी पासून सुरू करण्यात आले आहे. स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी पालिकेने शहरात ठिकठिकाणी स्वच्छतेचे फलक लावून व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन अभियानात सातत्य ठेवले आहे. शहर शंभर टक्के हागणदारीमुक्त व निर्मळ करण्यासाठी शहरातील प्रत्येक मुख्य चौकात व प्रभागात स्वच्छतेबाबत जनजागृती करणारे व अस्वच्छता केल्यास दंड या सूचनांचे पालिकेने फलक लावले आहेत.कऱ्हाडमध्ये कोठेही उघड्यावर शौचास बसण्यास मनाई आहे. उघड्यावर शौचास बसल्यास पाचशे रुपये दंडाची आकारणी करून संबंधित व्यक्ती विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा सूचनांचे तसेच शहरात दररोज रस्त्यावर व कचराकुंडीत पडणाऱ्या कचऱ्याबाबतही कर्मचारी व नागरिकांमध्ये कचरा विभाजनाबाबत माहिती व्हावी म्हणून ‘थांबा आपला कचरा एकत्र मिसळू नका’ असा ओला व सुका कचरा वर्गीकरण करणाऱ्या सूचनांचे फलक पालिका आवारात व शहरातील मुख्य ठिकाणी लावण्यात आले आहेत. शिवाय कचरा वर्गीकरणासाठी पालिकेतील प्रत्येक प्रभागातील मुकादमास खास प्रशिक्षणही देण्यात आलेले आहे. कचरा टाकत असताना ओला व सुका, असे विभाजन केल्यास कचरा कमी होऊ शकतो. हा हेतू समोर ठेवून वाढत्या कचऱ्याबाबत पालिका प्रशासन आता गंभीर झाले असून, त्यासाठी पालिकेकडून ठोस उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या आहेत.
या ठिकाणी स्वच्छतेबाबत पालिकेचे लक्ष
शहरातील भाजी मंडई येथील चांदणी चौक, कृष्णाबाई कार्यालय रोड, हटकेश्वर मंदिर, बापूजी साळुंखे पुतळा परिसर, मंगळवार पेठ, स्टेडियम परिसर, प्रभात टॉकीज, एसटी स्टँड परिसर, कर्मवीर चौक, कृष्णा नाका, पोपटभाई पेट्रोल पंप, जलशुद्धीकरण केंद्र, दूरध्वनी केंद्र परिसर याठिकाणी पालिकेकडून कचरा निर्मूलनासाठी व स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
तक्रार निवारणासाठी ‘टोल फ्री क्रमांक’
कऱ्हाड शहरात कचऱ्याबाबत व पालिकेतील समस्यांबाबत तक्रार करण्यासाठी कऱ्हाड पालिकेचा टोल फ्री क्रमांक चोवीस तास कार्यरत आहे. पालिकेच्या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास तत्काळ पालिकेकडून समस्या तसेच तक्रारीबाबत दखल घेतली जाणार आहे.
कऱ्हाड शहरातील वाढती कचऱ्याची समस्या ही रोखण्यासाठी पालिकेकडून अनेक प्रकारचे उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. त्यामध्ये कचरा गोळा करतानाच तो ओला व सुका असे वर्गीकरण करून गोळा करणे जेणे करून तो एकत्र मिसळणार नाही, अशा सूचना कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकांद्वारे व प्रशिक्षणातून देण्यात आलेल्या आहेत.
- विनायक औंधकर
मुख्याधिकारी,
नगरपालिका, कऱ्हाड
कऱ्हाड शहरातील पंचायत समितीसमोर पालिकेच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे स्वच्छतेचे फलक लावले आहेत.