अपसंपदा कमावल्याप्रकरणी बरडच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा

By दत्ता यादव | Published: July 2, 2024 08:56 PM2024-07-02T20:56:27+5:302024-07-02T20:56:45+5:30

फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

case against veterinary officer of barad in case of embezzlement | अपसंपदा कमावल्याप्रकरणी बरडच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा

अपसंपदा कमावल्याप्रकरणी बरडच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा

दत्ता यादव, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : एकूण उत्पन्नाच्या पंचवीस टक्के अपसंपदा कमावल्याप्रकरणी फलटण तालुक्यातील बरड येथील पशुवैद्यकीय अधिकारी दिलीप महादेव नाझीरकर (वय ५५, रा. नारायण अपार्टमेंट, चिंचकर इस्टेट टीसी कॉलेजच्या पाठीमागे, बारामती, जि. पुणे) यांच्यावर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पशुधन विकास अधिकारी नाझीरकर यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू आहे.  ११ जून २०११ ते ७ सप्टेंबर २०१९  या  कालावधीत आपल्या पदाचा वापर करून नाझीरकर यांनी अर्जित उत्पन्नापेक्षा अन्य मार्गाने स्वतःची १५ लाख ८४ हजार १७१ रुपये किमतीची अपसंपदा गोळा केली. ही एकूण उत्पन्नाच्या २५.७ टक्के इतकी आहे. ही अपसंपदा त्यांनी गैर मार्गाने कमाविल्याचे चाैकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक विक्रम पवार यांनी सरकारच्यावतीने फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन राऊत अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, भ्रष्टाचारासंबंधात काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकांबद्दल तक्रार असल्यास पोलिस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे संपर्क साधावा, असे आवाहन उपअधीक्षक राजेश वाघमारे यांनी केले आहे.  

जिल्ह्यातील हा दुसरा गुन्हा

पशुवैद्यकीय अधिकारी दिलीप नाझीरकर यांच्यावर २०१९ मध्ये लाचलुचपतची कारवाई झाली होती. यामध्ये त्यांच्या संपत्तीची चाैकशी सुरू होती. ज्ञातस्त्रोतापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी आत्तापर्यंत जिल्ह्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वी नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक प्रवीण यादव यांच्यावर अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: case against veterinary officer of barad in case of embezzlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.