विनयभंगप्रकरणी निंबळकच्या पोलीसपाटीलवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:23 AM2021-07-24T04:23:03+5:302021-07-24T04:23:03+5:30
फलटण : जिल्हा परिषद शाळेतील कोरोना विलगीकरण कक्षात पीडित महिला असताना, तिच्या खोलीत येऊन, ‘तू माझ्यासोबत राहा तुला व ...
फलटण : जिल्हा परिषद शाळेतील कोरोना विलगीकरण कक्षात पीडित महिला असताना, तिच्या खोलीत येऊन, ‘तू माझ्यासोबत राहा तुला व तुझ्या मुलींना काही कमी पडू देणार नाही. तुझा चांगला संभाळ करीन,’ असे म्हणून वाईट हेतूने पीडित महिलेचा हात धरल्याप्रकरणी निंबळक (ता फलटण) येथील पोलीसपाटील यांच्यावर विनयभंग व ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १९ जुलै रोजी सायंकाळी ०४.३० वा. सुमारास व दि. २० जुलै रोजी सकाळी ९.३० व त्यानंतर सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास निंबळक (ता. फलटण) येथील जिल्हा परिषद शाळेतील विलगीकरण कक्षात पोलीसपाटील समाधान कळसकर (रा. निंबळक) यांनी पीडित महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला.
पीडित महिला ही निंबळक (ता. फलटण) येथील जिल्हा परिषद शाळेतील विलगीकरण कक्षात असताना, तसेच ती मागासवर्गीय आहे, हे पोलीसपाटील समाधान कळकसर यांना माहीत असताना, पीडित महिलेच्या विनयभंग केला. तसेच पुन्हा दुसऱ्या दिवशी पीडित महिलेच्या विलगीकरण कक्षातील खोलीत येऊन, तू विचार कर, माझ्याकडे पुष्कळ पैसे आहेत. तुझा चांगला संभाळ करीन, असे म्हणून महिलेबरोबर लगट करण्याचा प्रयत्न करून विनयभंग केला असल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे.
अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे हे करीत आहेत.