भ्रष्टाचाराची प्रकरणे काढणार निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:23 AM2018-04-14T00:23:49+5:302018-04-14T00:23:49+5:30
सातारा : ‘जिल्ह्यात १११ भ्रष्टाचाराची प्रकरणे आढळून आली आहेत. ही प्रकरणे तीन महिन्यांत निकाली लावण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, भ्रष्टाचाऱ्यांकडून रक्कम वसूल केली जाणार आहे,’ अशी माहिती सातारा दौºयावर आलेल्या पंचायती राज समितीचे अध्यक्ष आ. सुधीर पारवे यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात गुरुवारी पंचायती राज समितीने जिल्हा परिषदेच्या कारभाराचे २०१३-१४ च्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची साक्ष नोंदवली.
यानंतर आमदार पारवे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली. यावेळी आमदार दिलीप सोपल, आमदार दीपक चव्हाण, आमदार बाबूराव पाचर्णे, आमदार चरण वाघमारे, आमदार रणधीर सावरकर, आमदार अॅड. राहुल कुल, आर. टी. देशमुख, आमदार देवराज होळी, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधाकर भालेराव, आमदार सुधाकर कोहळे, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार किशोर पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, तुकाराम काते, आमदार राहुल बोंद्रे, आमदार भारत भालके, आमदार वीरेंद्र जगताप, आमदार राहुल मोटे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार डॉ. तानाजी सावंत, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार बाळाराम पाटील, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार दत्तात्रय सावंत यांच्यासह इतर अधिकारी व सदस्य उपस्थित होते.
अफरातफरीच्या प्रकरणांतील महसूल शासनाकडे जमा झाला पाहिजे. भ्रष्टाचाराची प्रकरणे आता प्रलंबित राहणार नाहीत, तीन महिन्यांत ही प्रकरणे निकाली काढली जातील.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे कामही उल्लेखनीय असेच आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी डिजिटल शाळांसाठी संकल्प सोडला आहे. अनेक ठिकाणी वर्ग खोल्या गावांनी बांधून दिल्या आहेत. लोकसहभागातून शिक्षणाच्या संदर्भाने क्रांती करण्याचे काम जिल्ह्याने केले. मंदिर बांधण्यासाठी निधी गोळा करण्यापेक्षा शाळांचे वर्ग खोल्या बांधण्यासाठी निधी द्यावा, या आवाहनालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात सर्वच आलबेल आहे, असे आम्ही म्हणणार नाही; पण सकारात्मक दृष्टिकोनातून सुरू असलेले काम पाहून आम्हाला समाधान वाटले आहे,’ असे आमदार पारवे म्हणाले.
दरम्यान, जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांचे संख्या कमी आहे, याबाबत शासन काही निर्णय घेणार आहे का? या प्रश्नावर एमबीबीएस डॉक्टरांची कमतरता असून त्याऐवजी इतर बीएएमएस, बीएचएमएसचे शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांची भरती करण्याच्या हालचाली शासन पातळीवर सुरू आहेत.
जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात प्रभावी काम
जिल्ह्यामध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचे काम अत्यंत प्रभावीरीत्या सुरू आहे. प्रशासन सकारात्मक दृष्टिकोनातून काम करत असल्याने लोकसहभागही मोठा मिळत आहे, असे गौरवोदगार पंचायती राज समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांनी काढले.
कामचुकार अधिकाºयांची पडताळणी
ज्या अधिकाºयांनी कामचुकारपणा केला आहे. त्यांची साक्ष लावून पडताळणी करण्यात येणार असल्याचा इशारा आमदार पारवे यांनी दिला असल्याने जिल्हा परिषदेत कामचुकार अधिकारी कोण? याबाबत चर्चा रंगली होती.