जातिधर्म ‘पीराच्या देवळा’बाहेर!
By admin | Published: October 31, 2014 12:46 AM2014-10-31T00:46:26+5:302014-10-31T00:48:49+5:30
सर्वधर्मसमभावाचे प्रतीक : एकाच छताखाली ‘राजेवलीबाबा अन् शंभूमहादेव’ची आराधना
प्रदीप यादव - सातारा
जिथं मुस्लिम समाजबांधव राजेवलीबाबांसमोर दुआ मागून माथा टेकतो अन् हिंदू समाजबांधव शंभूमहादेवाला वाहतो बेलफूल, असं सर्वधर्मसमभावाचं प्रतीक म्हणजे येथील मल्हार पेठेतील ‘पीराचं देऊळ’. इथं ऊरूस भरतो तो सर्व जातीधर्मीयांना सामावून घेणारा अन् होळी पेटते ती जातीपातीची विषवल्ली भस्म करणारी. इथं हिरव्या झेंड्यालाच साखरगाठ आणि लिंबाचा पाला बांधून उभारली जाते समतेची गुढी अन् आकाशकंदिलाच्या उजेडात इथल्या माणसांची दिवाळी होते प्रकाशमान.
सातारा शहरातील कर्मवीर पथाच्या बाजूला असलेल्या मल्हार पेठ याठिकाणी सामाजिक ऐक्याचं प्रतीक असलेलं ‘पीराचं देऊळ’. हिंदू-मुस्लिम समाजाचं आराध्य दैवत असणाऱ्या या देवस्थानाच्या नावातच समतेची भावना ओतप्रोत भरलेली आहे. इतकंच काय पण दोन्ही दैवतांची पूजाअर्चा करणारे पुजारी प्रकाश वायदंडे हे मातंग समाजातील आहेत.
या वैशिष्ट्यपूर्ण देवस्थानाबद्दल प्रकाश वायदंडे यांनी सांगितले की, ‘याठिकाणी राजेवलीबाबा आणि शंभूमहादेवाचं स्थान आहे. म्हणून याला ‘पीराचं देऊळ’ असं नाव पडल्याचं सांगितलं जातं. देवळाच्या गाभाऱ्यातील भिंतीवर शंभूमहादेवाचे मोठे चित्र काढले आहे. शेकडो वर्षांपासून हे देवस्थान इथं आहे. या देवस्थानाच्या देखभालीसाठी ट्रस्टची स्थापना केली आहे.’
‘आमची ही तिसरी पिढी दोन्ही दैवतांचे पुजारी म्हणून काम पाहत आहे. याठिकाणी एप्रिल-मे महिन्यात राजेवलीबाबांचा आठ दिवस ऊरूस भरतो. पुणे, मुंबई याठिकाणाहून भाविक येतात. सर्व जातिधर्मातील लोक यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. लोकवर्गणीतून हा सण उत्साहात पार पाडला जातो. त्याचप्रमाणे या देवळासमोरच होळीचा सण साजरा केला जातो. यामध्ये तरुणांचा सहभाग मोठा असतो. हिंदू-मुस्लिम सामाजिक ऐक्याचं हे प्रतीक बनलं आहे,’ असेही वायदंडे यांनी सांगितले.
कसल्याही प्रकारचे हेवेदावे आड न आणता एकत्रितपणे दोन्ही समाजातील प्रत्येक सण, उत्सव येथे आनंदाने साजरे केले जातात. पुजारी वायदंडे सांगत होते, वीस वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून मंदिराचा जीर्णोध्दार केला. मंदिराच्या दरवाजाच्या एका बाजूला ‘ओम’ आणि दुसऱ्याबाजूला ‘अर्ध चंद्रात चांदणी’ ही दोन्ही दैवतांची प्रतीकं आहेत. येथे येणारा प्रत्येक जण दोन्ही दैवतांसमोर मनोभावे माथा टेकतो. एकाच ठिकाणी हिंदू-मुस्लिमांची दैवतं असणारं हे ठिकाण समतेचे दर्शन धडवित आहे.
नवतरुण मंडळाचे राजीव वायदंडे, शशिकांत चांदणे, आदेश इंगळे, शुक्र भिसे, लखन लोंढे, ओंकार तपासे, तसेच नासिर शेख, कादरभाई शेख असे दोन्ही धर्माचे समाजबांधव प्रत्येक सण, उत्सव मिळून मिसळून याठिकाणी साजरे करतात. प्रत्येक वर्षी यात्रेला वर्गणी गोळा करून महाप्रसादाचे आयोजन केले जाते.